सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्य़ात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाने हजेरी लावून सर्वाना सुखद धक्का दिला. सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात १४.५६ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सर्वदूर झाल्याचे दिसून आले. पावसाने मोठी निराशा केलेल्या करमाळा तालुक्यात २२ मिमी इतका पाऊस झाल्याने तेथील शेतकरी समाधान व्यक्त करताना पावसाची मोठी तूट भरून काढण्यासाठी वरूणराजाने आणखी कृपा करावी म्हणून प्रार्थना केली जात आहे. माढा, माळशिरस, उत्तर सोलापूर, बार्शी आदी जवळपास सर्व भागात पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन सायंकाळी दमदार पावसाला प्रारंभ झाला. शहर व परिसरात पाऊस बरसत होता. या पावसामुळे सारे रस्ते जलमय होऊन वाहतुकीवर परिणाम झाला होता.

सखल भागात पावसाचे पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली होती. विशेषत: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत होत असलेल्या विकास कामांच्या भागात पावसाचे पाणी साचल्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवछत्रपती रंगभवन, हरिभाई देवकरण प्रशाला, लेडी डफरीन चौक या मार्गावर सुशोभीकरणासह तब्बल २१ कोटी खर्चाचा रस्ता तयार झाला आहे.

परंतु पावसामुळे हा रस्ता किती गुणवत्तेचा आहे, हे स्पष्ट झाल्याने त्यावर सार्वत्रिक चर्चा होत आहे. मंगळवार बाजाराजवळील सोमवार पेठेत सोलापूर महापालिकेच्या गणेश शॉपिंग सेंटरखालील नाल्यातून पावसाचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे शॉपिंग सेंटरसमोरील रस्ता पाण्याखाली गेला असून तेथून होणारी सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली होती. असेच चित्र इतरत्र काही भागात दिसून आले.

गेल्या २४ तासात जिल्ह्य़ात १६०.१२ मिली मीटर पाऊस पडला आहे. त्याची सरासरी १४.५६ मिमी आहे. माढा-२४.८१, करमाळा-२२, माळशिरस-२०.१०, उत्तर सोलापूर-१८.२३, बार्शी-१७.४०, सांगोला-१५.३३, पंढरपूर-१२.५६, मंगळवेढा-११, मोहोळ-९.४५, दक्षिण सोलापूर-४.९१ व अक्कलकोट-४.३३ याप्रमाणे पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.

जिल्ह्य़ात आतापर्यंत पावसाने मोठीच निराशा केली आहे. पावसाळा संपायला शेवटचे काहीच दिवस शिल्लक राहिले असताना आतापर्यंत जेमतेम ३८.७५ टक्के इतकाच पाऊस झाला आहे.

अद्यापि ६२ टक्के पावसाची तूट भरून काढण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. आतापर्यंत तालुकानिहाय झालेल्या पावसाची मिलीमीटरमधील आकडेवारी टक्केवारीसह अशी: माळशिरस-१८२.५० (५८.१६ टक्के), दक्षिण सोलापूर-२२७.८९ (४८.२४ टक्के), बार्शी-२१९.४४ (४६.५५ टक्के), उत्तर सोलापूर-२१३.३१ (४५.१५ टक्के), सांगोला-१४६.४८ (४४.४० टक्के), पंढरपूर-१५०.४९ (३५.५२ टक्के), माढा-१३८.७२ (३४.९६ टक्के), मोहोळ-१४६.५७ (३३.३० टक्के), करमाळा-१३०.५२ (३१.८६ टक्के) आणि मंगळवेढा-९७.०९ (२५.२५ टक्के). यात केवळ माळशिरस तालुक्यात ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस झाला असून उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये त्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे.

सांगली जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

सांगली : जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले असून सर्वाधिक पाऊस कडेगाव येथे ४३.४ मिलीमीटर नोंदला गेला. जिल्हयात सरासरी १३.४० मिलीमीटर पाउस गेल्या २४ तासांत झाला असल्याने कृषी विभागाकडून सांगण्यात आले. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त असला तरी परतीच्या मान्सूनची प्रतीक्षा असताना अद्याप पश्चिमेकडील वाऱ्याचाच पाऊस पडत असल्याने हंगाम पुढे गेल्याचेही मानले जात आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तालुका स्तरावर नोंदला गेलेला पाऊस असा –  कंसात १ जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज – ८.९ (५३५.४), जत ५.८ (२११.६), खानापूर-विटा  २७ (३५१.८), वाळवा-इस्लामपूर  – ८.६ (७३४.२), तासगाव ७.४ (४०२.७), शिराळा – ६.८ (१८९९.८), आटपाडी – २४.७ (२०८.८), कवठेमहांकाळ १०.३ (३०७.८), पलूस – ९ (४३६.१) व  कडेगाव ४३.४ (७३६).

दरम्यान, जिल्ह्यातील चांदोली धरणात गुरुवारी सकाळी ८ पर्यंत ३४.०२ टी.एम.सी. पाणीसाठा झाला असून या धरणाची साठवणक्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये १०४.६१, धोम धरणात १३.४५, कन्हेर धरणात १०.०५ टीएमसी पाणीसाठा आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात २४.९६ व राधानगरी धरणात ८.१५ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. अलमट्टी धरणाची साठवणक्षमता १२३ टी.एम.सी. असून हे धरण १०० टक्के भरलेले आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे चांदोली धरणातून १ हजार ७०१ क्युसेक तर कोयना धरणातून ११ हजार ४८० क्युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून ३४ हजार ३२४ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. सांगलीतील आयर्वनि पूल येथे कृष्णा नदीची पाणीपातळी ९ फूट ३ इंच (धोकापातळी ४५ फूट) तर अंकली पूल हरिपूर येथे ११ फूट ६ इंच इतकी पाण्याची पातळी आहे.

कोल्हापुरात पावसाची हजेरी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाच्या हलक्या ते माध्यम सरी कोसळत राहिल्या. गगनबावडा तालुक्यात सर्वात जास्त २२. ५० मि.मी तर चंदगडमध्ये सर्वात कमी ०.१७ मि.मी पाऊ स पसल्याचे वृत्त आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ९४ मि.मी इतका पाऊ स झाला आहे. गेल्या २४ तासांतील सरासरी ७ .८३ मिमी इतकी नोंद झाली.

वेधशाळेने ३-४ दिवस पाऊ स पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. शहरात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती. दिवसभर पावसाच्या हलक्या सरी तर कधी एखादी मोठी सर असे संमिश्र वातावरण नागरिकांनी अनुभवले.

अमरावती, अकोल्याने पावसाची सरासरी ओलांडली ; पश्चिम विदर्भातील सतरा तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस

अमरावती : विभागातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत यंदा जोरदार पावसाची नोंद झाली असून या जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. अमरावती जिल्ह्यात १०५ टक्के, अकोला १०३ तर बुलढाणा जिल्हा देखील सरासरी गाठण्याच्या मार्गावर असून येथे ९६ टक्के पाऊस झाला आहे. यवतमाळ, वाशीम जिल्ह्यांमधील पावसाची तूट हा मात्र चिंतेचा विषय आहे. विभागातील एकूण सतरा तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

पूर्वमोसमी पावसाने यंदा दडी मारली होती. यंदा मोसमी वारे पंधरा दिवसांच्या विलंबाने पश्चिम विदर्भात दाखल झाले. वारे दाखल होऊनही ते बरसत नसल्याने चिंता होती. मात्र जुलै अखेरीस पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा करण्यात येत होती. ऑगस्टमध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण होऊन संपूर्ण महिनाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे.

गेल्या आठवडय़ात अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गेल्या महिन्यात तर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मेळघाटसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. वाशीम, यवतमाळ हे जिल्हे वगळता इतर तीन जिल्ह्यांची तहान भागल्याचे चित्र दिसून येत आहे. एक-दोन दिवसांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला विलंब झाला. शिवाय मान्सूनने जोर पकडण्यासही उशीर केला. पश्चिम विदर्भात जुलै महिना हा पावसाचा समजला जातो. मात्र, यंदा जुलैचे पहिले तीन आठवडे कोरडेच गेले. जुलैच्या अंतिम आठवडय़ात मात्र पावसाने जोर धरला. यंदा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात चांगला पाऊस झाला. ऑगस्टअखेरीस मान्सून परत एकदा सक्रिय झाला. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही दमदार पाऊस झाल्याने अकोला आणि अमरावती जिल्ह्याने सरासरी ओलांडली तर बुलढाणा जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ५०६ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ६० टक्के, तर वाशीम जिल्ह्यात ४९० मि.मी. म्हणजे ६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ७९० मि.मी. (१०५ टक्के), अकोला ६६७ मि.मी. (१०३ टक्के) तर बुलढाणा जिल्ह्यात ५९० मि.मी. (९६ टक्के) पाऊस पडला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, धारणी चिखलदरा, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा झाला आहे. सध्या अप्पर वर्धा धरणाचे पाच दरवाजे उघडले असून  वान या मोठय़ा प्रकल्पासह शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, सायखेडा, नवरगाव, अडाण, ज्ञानगंगा, पलढग या मध्यम प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे.

लातूर जिल्ह्य़ात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी ; मदनसुरी मंडळात ९१ मि. मी. पाऊस

लातूर :  जिल्हय़ात पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. निलंगा तालुक्यातील मदनसुरी मंडळात अतिवृष्टी झाली असून २४ तासात तब्बल ९१ मि. मी. पाऊस  झाला आहे. निलंगा तालुक्यातीलच हाडगा, तुपडी रस्त्यावर पुलावरून पाणी वाहिल्याने नागरिकांची मोठीच तारांबळ उडाली. पाऊस बरसत असला तरी तो असमान पद्धतीने पडत असल्याने काही भागात आनंद तर काही भागात पावसाची प्रतीक्षा असे वातावरण आहे.

जिल्ह्य़ात व काही तालुक्यांमध्ये बुधवारी सकाळपासूनच आभाळ  होते. दुपारनंतर जिल्हय़ातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. मदनसुरी मंडळात ९१ मि. मी., औराद शहाजनी ४९, कासार बालकुंदा ५५, कासारशिरसी ४४, बोरोळ ३४, किल्लारी ३६, औसा ३९ मि. मी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात होत असून अपेक्षित सरासरीच्या ११० टक्के, तर वार्षिक सरासरीच्या ८० टक्के पाऊस या तालुक्यात झाला आहे. अर्थात या तालुक्यातही समान पद्धतीचा पाऊस नाही. काही भागात चांगला पाऊस आहे तर काही ठिकाणी तुरळक पाऊस आहे. सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यात असून अपेक्षित सरासरीच्या ५३.३७ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ३८.७२ टक्के पाऊस आहे. लातूर तालुक्यातही पावसाचे प्रमाण अत्यल्प असून अपेक्षित सरासरीच्या ५५.२२ तर वार्षिक सरासरीच्या ४०.०६ टक्के इतकाच आजवर पाऊस झाला आहे. तुलनेने निलंगा, जळकोट या तालुक्यात बरा पाऊस आहे.

गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पडलेल्या २४ तासात जिल्हय़ात सरासरी १०.९६ मि. मी. इतका पाऊस झाला. या पावसाने जिल्हय़ाची सरासरी ४५०.४७ मि. मी. वर पोहोचली आहे. अपेक्षित पावसाच्या ७७.४१, तर वार्षिक सरासरीच्या ५६.९६ टक्के पाऊस आजवर झाला आहे.

मांजरा परिसरात पाऊस, तरीही..

बुधवारी लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या कार्यक्षेत्रात अर्धा तास चांगला पाऊस झाला. मात्र, या पावसाने त्या भागातील जमिनीची तहान भागली आहे. मात्र,धरणात पाणी साठलेले नाही. गुरुवारी दिवसभर आभाळ होते. धरणक्षेत्रात रात्री पाऊस झाला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत जोरदार पाऊस ; ग्रामीण भागात बाजरीचे नुकसान

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. तर ग्रामीण भागात झालेल्या हलक्या, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळवाऱ्यामुळे शेकडो एकरवरील बाजरीचे पीक अक्षरश: आडवे झाले. गुरुवारच्या पावसाचा जलसाठय़ांसाठी कुठलाही फायदा झालेला नसून ग्रामीण भागात अजूनही टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

औरंगाबाद व परिसरात मागील काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. गुरुवारी दुपारी सुमारे वीस मिनिटे औरंगाबाद शहरात जोरदार पाऊस झाला. परिसरातील आडगाव, निपाणी, आपतगाव, चितेगाव, परदरी आदी गाव परिसरातही चांगला पाऊस झाला. मात्र, काही ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच असल्याने काढणीला आलेली बाजरी अक्षरश: आडवी झाली. आडगाव परिसरात साधारण ४०० एकरवर बाजरीची लागवड झालेली आहे. त्यातील बहुतांश बाजरीचे नुकसान गुरुवारच्या पावसाने झाले आहे. पोळ्याला आणि गणपतीमध्ये झालेल्या पावसाने माना टाकू लागलेल्या पिकांना कसे तरी जीवदान मिळाले होते. पण गुरुवारच्या पावसाने काढणीला आलेल्या बाजरीचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकरी अशोकराव लोखंडे यांनी सांगितले.

गोलेगाव आदी परिसरातही गुरुवारी चांगला पाऊस झाला आहे. मात्र या भागातील पिकांना गुरुवारच्या पावसाचा फायदाच झाल्याचे शेतकरी बेग हमीद यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात पाणीच पाणी

औरंगाबादेत गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास झालेल्या पावसाने दाणादाण उडाली. अनेक भागात गुडघ्याएवढे पाणी साचले होते. वाहतूक विस्कळीत झाली होती. नाल्या, खड्डे भरून रस्त्यांवरून पाणी वाहत होते. पण पावसाचा हा जोर शहराबाहेरील भागात दिसून आला नाही.