मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी नुकताच अमित ठाकरेंचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याचीही चांगलीच चर्चा झाली. कारण या विवाह सोहळ्याला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या विवाहसोहळ्याची धामधूम आता संपली आहे. मात्र राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या आशीर्वादाने पालघरमध्ये ५०० आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह होणार आहे. पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील ५०० जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा ९ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राज ठाकरेंची उपस्थिती असणार आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे हे दोघेही या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी हजर असणार आहेत.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांची मनसे, कामगारांची मनसे असेही या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर या ठिकाणी असलेल्या खैरपाडा मैदानात हा सामुदायिक विवाहसोहळा ९ फेब्रुवारीला होणार आहे. पालघर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विवाहसोहळ्याचे आयोजन केले आहे. एक स्तुत्य असा उपक्रमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाती घेतला आहे असेच म्हणता येईल. या संदर्भातला एक व्हिडिओही मनसेने प्रसारित केला आहे.

पहा व्हिडिओ 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि फॅशन डिझायनर मिताली बोरुडे यांचा विवाह सोहळा मुंबईत अत्यंत दिमाखात पार पडला. या विवाह सोहळ्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मनसे या सगळ्याच प्रमुख पक्षाच्या नेत्यांची हजेरी होती. या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चाही रंगली होती. ती आता संपली आहे तोच मनसेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. पालघर येथील पाचशे जोडप्यांच्या सामुदायिक विवाहाला राज ठाकरे हजेरी लावणार असून ते त्यांना आशीर्वादही देणार आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही असणार आहेत.