सध्या राज्याच्या विविध भागांत सुरू असणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज ठाकरे यांनी हवामान वेधशाळांच्या कार्यक्षमतेविषयी शंका उपस्थित केली. परदेशातील वेधशाळा हवामानातील बदलांची पूर्वसूचना वेळेत आणि अचूक देतात. मग, आपल्या देशातील वेधशाळांना ही गोष्ट का शक्य होत नाही, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना हवामानातील बदलांची आगाऊ सूचना दिल्यास शेतीचे नुकसान टळू शकेल, असे राज यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत ते गारपीटग्रस्त भागाचा दौराही करणार आहेत. निव्वळ विरोधाचे राजकारण न करता, नव्या सरकारला या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तसेच सरकारी अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा पंचनामा योग्य पद्धतीने होण्याचीही गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.   
दरम्यान, शनिवारी नाशिकमधील शिरवाळा येथे द्राक्ष बागायतदारांनी नुकसानीची योग्य भरपाई मिळावी यासाठी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला होता. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी महामार्गावर द्राक्षे ओतून आपला निषेध व्यक्त केला. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यालाही गारपीटीने लक्ष्य केले. त्यामुळे या ठिकाणच्या द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.