सौदीच्या कंपनीची नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात भागीदारी आहे. त्यामुळे कोकणात परबांच्या ठिकाणी अरब येतील, म्हणजेच परब गेले आणि अरब आले असे चित्र उभे राहील असा मार्मिक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. जमीनदार शेतकऱ्यांना प्रकल्पात भागीदार बनविण्याचा प्रयोग महाराष्ट्रात व्हायला हवा. तसे झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार नाहीत असेही ते म्हणाले. कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर उपस्थित होते.

सरकारचा कोणताही प्रकल्प व्हायचा असेल तर तो प्रथम धनदांडग्यांना समजतो, ते जमिनी विकत घेतात. तेच नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात झाले; म्हणजेच सरकारमधील माणसे पॉलिसी विकतात असाच प्रकार घडतो. त्यामुळे परप्रांतीयांना जमिनी विकणे थांबायला हवे असे राज ठाकरे म्हणाले. एखाद्या शहरात रिंगरोड व्हायचा असला तरी धनदांडग्याना पहिले समजते असे ते म्हणाले.

जमिनीच्या तुकडय़ासाठीच युद्धे

प्रकल्पात जमीनदार शेतकऱ्यांना भागीदार बनवा असे यापूर्वीच म्हटले होते. सन २०१३ मध्ये स्पष्ट भूमिका घेतली होती. कोकणात होणाऱ्या प्रकल्पात जमीनमालक शेतकरी भागीदार बनला तर देशोधडीला लागणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. प्रकल्पात गुंतवणुकीपेक्षा शेतकरी भागीदार झाला तरच त्याचे अस्तित्व  टिकेल; अन्यथा जमीन विकल्यानतंर त्याचे अस्तित्वच राहणार नाही असे ते म्हणाले. रामायणवगळता जगात आजपर्यंत झालेली सर्व युद्धे जमिनीच्या तुकडय़ासाठी झाली आहेत असे राज ठाकरे यांनी सांगून लग्न झाल्यावर आपल्या अस्तित्वासाठी घर व्हावे अशी प्रत्येकाची अपेक्षादेखील असते असे उदाहरण दिले.

कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकू नका असे सांगताना राज ठाकरे म्हणाले, लोकांनी आपल्या विकासासाठी, रोजगाराच्या प्रश्नावर प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला सरकारवर अवलंबून कशासाठी राहता. गुजराती, मारवाडी लोकांना सरकार मदत करते काय? आपला हापूस आंबा, नाशिकची द्राक्षे निर्यात होतच असतात असे राज ठाकरे म्हणाले.

कोकणी माणूस मुंबईत मोठय़ा प्रमाणात आहे. त्यातील अनेकजण मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक झाले. त्यांनी कोकणासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, कोकणी माणसानी जमिनी विकू नये आणि कोकणात नवनिर्मिती करण्यासाठी या लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. आपण स्थित्यंतरांचा आढावा घेतला पाहिजे. परप्रांतीय कब्जा करायलाच येतात ही आजपर्यंतची अनेक उदाहरणे आहेत असे ते म्हणाले.

परप्रांतीय कब्जा करतात असे सांगताना मुलुंडमध्ये खासदार किरीट सोमय्या यांनी भाजी विक्रेत्यावर अन्याय केला. त्याची मुजोरी मुंबईत होते मग पुढील काळात कोकणातही परप्रांतीय मुजोर बनतील असे राज ठाकरे म्हणाले. मुंबईत ८० नगरसेवक अमराठी आहेत. परप्रांतीय येतात, कब्जा करतात आणि मतदारसंघही बांधणी करतात याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे राज ठाकरे म्हणाले. उद्योग, आर्थिक प्रगतीच्या विरोधात मी नाही. महाराष्ट्रात अनेक उद्योग आहेत. पण नाणार येथील ग्रीन रिफायनरी, बुलेट ट्रेनला विरोध केला. त्याची कारणे दिली आहेत. कोकणासारखा निसर्गसुंदर प्रदेश दुसऱ्यांच्या हाती मिळाला असता तर निश्चितपणे कोकणचे नंदनवन झाले असते. कर्नाटकचे आमदार थकले असतील तर केरळात विश्रांतीला त्यांनी यावे असे केरळा टुरिझमने ट्विट केले म्हणजेच केरळला पर्यटनाचा अभिमान वाटतो ते कोकणाला का वाटले नाही असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

कोकणात अप्रतिम जेवण आहे. त्याला आपण कंटाळले आहोत. या ठिकाणी चायनीज गाडय़ा दिसताहेत, हे ठीक नाही. शेट्टी, गुजराती, मारवाडी आपल्या जेवणाला कंटाळत नाही. मग कोकणी माणूस चायनीज संस्कृतीला थारा कसा देतो? असे राज ठाकरे म्हणाले. आपली संस्कृती परप्रांतीयाच्या आगमनानुसार बदलली तर आपलं काय होणार? हे लक्षात यायला हवे, असे त्यांनी बदलत्या कोकणावर टिपणी करताना स्पष्ट केले.

सरकारे येथील आणि जातील आपला विकास सरकारने करावा अशी अपेक्षा ठेवणे सोडून द्यायला हवे. आर्थिक विास व रोजगाराच्या प्रश्नावर कोकणी माणसांनीच हात पाय हलवायला हवेत, असे राज ठाकरे म्हणाले. त्याबाबतची सन २०१४ मध्येच मनसेचे दोरण जाहीर केले होते, असे त्यांनी सांगितले.