कोणत्याही परिस्थितीत नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. ‘नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,’ असा थेट आरोप राज यांनी केला.

आज मुलुंडमधील सभेत राज यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. भारतीय जनता पक्ष बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहत आहे’, असे सांगत मनसे अध्यक्ष यांनी काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणांवरून भाजपावर विखारी टीका केली. इतकं घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष उभा राहतो,लाजा वाटत नाहीत का तुम्हाला…, असे म्हणत राज कडाडले. पीडिता हिंदू आहे की मुस्लिम असं कसं तुम्ही बघू शकता. बलात्कार हा बलात्कारच असतो. माझं मत आहे की, बलात्काऱ्यांना भर रस्त्यात मारलं पाहिजे, जसं सौदी अरेबियात बलात्काऱ्यांचे हात पाय तोडतात तसं इथेही करा. अशा गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे तरच गुन्हेगारांच्या मनात दहशत बसेल, असे राज म्हणाले.

मनसेच्या वतीन मुलुंड येथे एका शानदार सोहळ्यात १०० महिलांना रिक्षांचे वाटप करण्यात आले. महिलांना सक्षम करण्यासाठी मनसेने हे पाऊल उचलले असून राज यांच्याहस्ते महिलांना रिक्षांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी झालेल्या सभेत राज बोलत होते.