महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत नोटाबंदी आणि इतर मुद्द्यांवर टीका केली. या भाषणात त्यांनी एकवेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण मोदीभक्त नकोत असा टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली रे झाली की भक्त बोलायला लागतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलायचे नाही अशीच भूमिका घेतली जाते. त्यामुळे एकवेळ मोदी परवडले पण भक्त नको रे बाबा असे उद्गार आज राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये काढले.

आपल्या भाषणात त्यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरही टीका केली. नोटाबंदीचा निर्णय हा अर्थव्यवस्थेला मागे घेऊन जाणारा निर्णय होता. या निर्णयामुळे सर्वात जास्त पैसा आला तो भाजपाकडे अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. गेल्या काही वर्षात साडेतीन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यावरही कोणी काही बोलले नाही. काही प्रसारमाध्यमेही सत्ताधाऱ्यांच्या अधीन गेली आहेत अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

आपल्या घणाघाती भाषणात त्यांनी त्रिपुराच्या विजयाचीही खिल्ली उडवली. त्रिपुरात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार फोडले आणि म्हणे संघाने ४० वर्षे केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. आमदार फोडायला ४० वर्षे कशाला लागतात? तसेच देशात राम मंदिराचा मुद्दा पुढे आणावा लागतोय कारण विकासाची काही कामेच झालेली नाही. अशात हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करायची आणि दंगली घडवून आणायच्या आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला. आपल्या याच भाषणात राज ठाकरेंनी एकवेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण त्यांचे भक्त नकोत अशी टीका केली.