04 March 2021

News Flash

राजेंद्र दर्डांनी तीन वर्षानंतर डोक्यावर घातली काँग्रेसची टोपी !

अलीकडच्या काळात राजेंद्र दर्डा यांनी सार्वजनिक कार्यक्रमांतील उठबस वाढवली आहे.

Rajendra Darda : दर्डा पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षापासून सुरक्षित अंतर ठेवलेले माजी मंत्री राजेंद्र दर्डा पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मंगळवारी हजेरी लावली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच दर्डा यांनी काँग्रेसची टोपी डोक्यावर घातली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासोबत शिबिरस्थळी दर्डा पहिल्या रांगेत बसले होते. आमदार सुभाष झाम्बड यांच्यासोबत दर्डा यांनी दुपारच्या सत्रात शिबिरस्थळी हजेरी लावली. झाम्बड यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.

अलीकडच्या काळात राजेंद्र दर्डा यांनी सार्वजनिक कार्यक्रमांतील उठबस वाढवली आहे. भजन, मुशायरा अशा ठिकाणी ते आवर्जून हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय त्यांच्या वाढदिवसाला संपूर्ण शहरात बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचादेखील समावेश होता. काँग्रेसच्या शिबिरात आज कार्यक्रम पत्रिका, सभास्थळाचे बॅनर यावर दर्डा यांचा फोटो नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी काँग्रेस सेवादलाच्या बॅनरवर त्यांना अग्रस्थान देण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा ते सक्रिय होण्याचे संकेत मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी थेट कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात हजेरी लावली. त्यामुळे दर्डा पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कार्यकर्ता शिबिरांचे आयोजन केले जात आहे. पालघर, जळगावनंतर औरंगाबाद येथे काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिला आणि युवकांचे स्वतंत्र शिबीर घेण्यात आले. सरकार विरोधी रान पेटवायच असेल तर युवकांनी आक्रमक व्हायला हवं, असं मत युवक काँग्रेसच्या शिबिरात काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आले.

अलीकडच्या काळात अधिकाऱ्यांचं येणं-जाणं वाढलं
सध्याचं सरकार म्हणजे आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात, अशी परस्थिती आहे. बोगस संस्थांच्या नावाखाली ४० हजार संस्था बंद केल्या. ज्या आहेत त्याही नीट चालत नाही. तीन वर्षाच्या काळात या सरकारने सहकार चळवळ मोडीत काढल्याचा आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. पुण्याच्या पालकमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवं, वर्षभरात काय करायचं ते करून घ्या, असं सांगत आपली पुन्हा सत्ता येणार नसल्याचे त्यांनी सुचवले आहे. त्यामुळेच की काय अलीकडच्या काळात काँग्रेस नेत्यांकडे अधिकाऱ्यांची ये-जा वाढली असल्याचे पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर तीन वर्षानंतर काँग्रेसच्या मंचावर बसलेले माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी स्मित हास्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 6:04 pm

Web Title: rajendra darda reactivated in congress aurangabad
Next Stories
1 काँग्रेससोबत यायचे असेल तर शिवसेनेने हायकमांडशी संपर्क साधावा-पृथ्वीराज चव्हाण
2 निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव प्रकरण: महादेव जानकर दोषमुक्त
3 कॉ.गोविंद पानसरे हत्याप्रकरण: वीरेंद्र तावडेला न्यायालयाकडून जामीन मंजूर
Just Now!
X