शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर इंदिरा नगरजवळ होणारे अपघात टाळण्याच्या उद्देशाने उड्डाणपुलाखालून राजमाता बोगद्याद्वारे होणारी वाहतूक १२ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. उड्डाणपुलालगतच्या इंदिरा नगर-गोविंद नगर, राजमाता या ठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. या कोंडीमुळे लहान-मोठे अपघातही होत असतात. हे सर्व टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून गोविंद नगरकडून तसेच मुंबईकडून राजमाता येथून इंदिरा नगरकडे जाण्यासाठी वापरण्यात येणारा राजमाता हा बोगदा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. हा बोगदा बंद केल्याने वाहतुकीच्या मार्गामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. गोविंद नगरकडून राजमाता बोगद्यातून इंदिरा नगरकडे जाणारी सर्व वाहतूक डाव्या बाजूने वळून पुढे उड्डाणपुलाच्या स्तंभ क्र. १७१ जवळून उजवीकडे वळून इंदिरा नगर, पाथर्डीफाटा, मुंबईकडे जाईल. मुंबईकडून राजमाता बोगद्यातून इंदिरा नगरकडे जाणारी वाहतूक ही आता तशी न जाता सरळ पुढे जाऊन उड्डाणपुलाखालील स्तंभ क्रमांक १७१ जवळून उजवीकडे वळून इंदिरा नगरकडे जाईल. इंदिर नगर व मुंबई नाक्याकडून येणारी वाहतूक ही राजमाता बोगद्यातून गोविंद नगरकडे न जाता सरळ पुढे जाऊन लेखानगर येथील पुलाखालून उजवीकडे ‘यू टर्न’ घेईल. मुंबईनाका ते लेखा नगर आणि लेखा नगर ते मुंबईनाका हे दोन्हीही सव्‍‌र्हिसरोड एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येणार असून राजमाता बोगदा हा फक्त पादचाऱ्यांसाठी मोकळा राहील, असे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी म्हटले आहे.