18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

राजू शेट्टींचे ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचे संकेत

‘केंद्र सरकार असंवेदनशील’

लोकसत्ता टीम | Updated: August 13, 2017 1:40 AM

किमान समान कार्यक्रमावर या संघटना एकत्र आल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पक्षातून निलंबित केल्यामुळे राज्य शासनात आमचे प्रतिनिधित्व नाही.  केंद्रात ‘एनडीए’ला आमचा बाहेरून पाठिंबा आहे. तेव्हा दोन्ही सरकारमध्ये आम्ही केवळ औपचारिकता म्हणून आहोत. दोन्ही सरकारे शेतकरीविरोधी आहेत. त्यांच्यासोबत राहायचे की नाही याबाबत पंधरा दिवसांत पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय जाहीर करू, अशी माहिती देऊन ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचे संकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले.

निवडणुकीपूर्वी भाजप व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दीडपड हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तेथील कृषी क्षेत्राचा विकासदर वाढवल्याचे दर्शवले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी त्यांना मते देऊन सत्तेवर आणले. परंतु गेल्या तीन वर्षांचा केंद्र सरकारचा लेखाजोखा बघता त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे- घेणे नसल्याचे दिसते. त्यामुळे भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत केवळ मते घेण्याकरिता शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दिले की त्यांना शेतीची जाण नाही यापैकी एक गोष्ट कबूल करण्याची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले खोटे आश्वासन आणि मध्यप्रदेशच्या भाजप सरकारने सात शेतकऱ्यांच्या घेतलेल्या बळीमुळे शेतकरी संतप्त आहे.

त्यामुळेच प्रथमच देशातील शेतकरी व शेतकरी संघटना एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. देशात विविध टप्यात होणाऱ्या आंदोलनानंतर २० नोव्हेंबरला दिल्लीतील जंतरमंतरला सगळे एकत्र येऊन मोठे आंदोलन करणार आहोत. मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेण्यात येणार नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे झुकून कर्जमाफीची घोषणा केली. शासनाने सरकारच्या तिजोरीवर ३४ हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचे सांगितले असले तरी मुळात ही रक्कम १७ ते १८ हजार कोटींच्या वर नाही, असे शेट्टी म्हणाले.

पावसामुळे विदर्भातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता विदर्भात आलो असून जनमंचशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला रविकांत तुपकर, चंद्रकांत वानखेडे, जनमंचचे अॅड. अनिल किलोर, शरद पाटील आदी उपस्थित होते.

केंद्र सरकार असंवेदनशील

केंद्र सरकार पूर्णपणे असंवेदनशील आहे. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे त्यांनी केलेल्या दुर्लक्षातून ते स्पष्ट होते. हे शेतकरी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करतात, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कवटय़ा ठेवतात, स्वतचे मूत्र प्राशन करणे, किडे खाणे यासह इतर पद्धतीचे आंदोलन करीत असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केल्यावरही सरकार लक्ष देत नसल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.

 

First Published on August 13, 2017 1:40 am

Web Title: raju shetti not happy with central government