एक लाख कोटी रुपयांचा बोजा सहन करण्याची तयारी दाखवून सातवा वेतन आयोग लागू केला जात असेल तर त्याला आमचा विरोध नाही. पण आधी शेतकऱ्यांचा ‘सातबारा’ कोरा करा आणि त्यानंतर खुशाल  सातवा वेतन आयोग लागू करा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे घेतली. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीतच आमची युती भाजपशी होती. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढल्या जातील, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, असेही यावेळी खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले.

येथील माहेर मंगल कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बठक शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने ते या बठकीला हजर राहू शकले नाही. मात्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, महिला आघाडीच्या सारिका ढगे, जिल्हाध्यक्ष माणिक कदम, महिला आघाडीच्या ढगे यावेळी उपस्थित होते. आज झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बठकीत नांदेडचे प्रकाश पोपळे यांची स्वाभिमानी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  खोत यांच्या जागी आता पोपळे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे आली आहेत.

आज झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बठकीत विविध महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. स्वाभिमानी संघटना राज्यात कर्जमुक्ती अभियान राबवणार आहे. नियमनमुक्तीचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.

सध्या कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना प्रतिकेलो ५ रुपये अनुदान देण्यात यावे तर नाफेडने यापुढे १२ रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा, शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या आणि कांद्याची साठेबाजी करून शेतकऱ्यांचा कांदा सडवणाऱ्या नाशिकच्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, थकित ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे, सध्या सर्वत्र कडधान्याच्या किमती उतरल्या असून सरकारने कडधान्यांची खरेदी करणारी केंद्रे सुरू करावीत व आधारभूत किमतीत कडधान्य खरेदी करावे, अद्यापही अडत घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी. आजही अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असून पिके करपली आहेत. अशावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. एक तर नुकसानभरपाई द्यावी किंवा पीक विमा द्या. परंतु अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका आदी ठराव स्वाभिमानी संघटनेच्या या बठकीत घेण्यात आले. यानंतर राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी विविध शेती प्रश्नावर आपली मते मांडली.

शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी असताना शासनाने कृषी पंपाची वीज खंडित करू नये असे विविध ठराव या बठकीत घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बठकीनंतर ब्राह्मणगाव येथे खासदार शेट्टी, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे आदींचा सत्कार करण्यात आला.