मेळघाटातील महिलांच्या समस्याही मांडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर पहिल्यांदाच मेळघाटातील आदिवासी महिला त्यांना राखी बांधण्यासाठी देशाच्या राजधानीत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे, बांबूपासून तयार केलेली पर्यावरणपूरक राखी बांधत असतानाच मेळघाटातील महिलांची कैफियत देखील त्या पंतप्रधानांसमोर मांडणार आहेत.

मेळघाटातील बांबूच्या राख्यांनी विदेशातील नागरिकांना भूरळ घातली. मात्र, या बांबूच्या राख्या तयार करणाऱ्या आदिवासी महिलांना  स्वत: ही राखी पंतप्रधानांना बांधायची होती. या माध्यमातून त्यांना त्यांच्यापर्यंत एक संदेश पोहोचवायचा होता. आजही मेळघाटातील आदिवासी महिलांना स्नानगृहे उपलब्ध नाहीत. त्याचा परिणाम आरोग्यापासून तर सर्वच गोष्टींवर होत आहे. मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तुंसह राखी तयार करण्याचे काम होते. स्वच्छता अभियानाअंतर्गत याच महिलांनी  बांबूची १३५ स्नानगृहं तयार केली. दोन वर्षांपूर्वी या महिलांनी हीच कैफियत पोहोचवण्यासाठी खासदारांना पत्र लिहिले होते. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे यांच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधानांना राखी बांधण्याची गळ घातली. देशपांडे यांनी आयटीसीआरचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे यांना या महिलांचे विनंती पत्र पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. सुमारे महिनाभरापूर्वीच या महिलांनी पंतप्रधानांना राखी बांधण्यासाठी विनंती पत्र पाठवले होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना पंतप्रधानांकडून होकार मिळाला. या होकारानंतर मेळघाटातील चार आदिवासी महिलांना घेऊन संपूर्ण बांबू केंद्राचे सुनिल व निरुपमा देशपांडे शुक्रवारी, २४ ऑगस्टला रवाना झाले.