महायुतीचे उमेदवार संजय जाधव उद्या (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शनिवार बाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे हेही उद्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करण्यास जय्यत तयारी केली. पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. एकाच दिवशी दोन्ही उमेदवार अर्ज भरणार असल्याने प्रशासनाची कसरत होणार आहे. महायुतीचे उमेदवार जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी शहरातून पदयात्रा काढण्यात येणार आहे. शिवसेना संपर्कनेते रवींद्र मिल्रेकर, सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार मीरा रेंगे, माजी आमदार हरिभाऊ लहाने, बबन लोणीकर, शिवाजी चौथे, भाजपाचे प्रदेश चिटणीस विजय गव्हाणे, रिपाइं राष्ट्रीय संघटक गौतम भालेराव, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सुधाकर खराटे, युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. राहुल पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शनिवार बाजार येथून सकाळी १० वाजता पदयात्रेस प्रारंभ होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भांबळे दुपारी आपला अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पवार यांच्या उपस्थितीत स्टेडियम मदानावर जाहीर सभा होणार आहे.