रामजन्मोत्सव अर्थात रामनवमी उत्सव शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र मोठय़ा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहरातील रामनाथमधील आंग्रेकालीन पुरातन श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. तीनशे ते साडेतीनशे वष्रे पुरातन असलेल्या या राममंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी पुरोहितांच्या उपस्थितीत श्रींची विधिवत पूजा करून रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी ह.भ.प. श्रीकांतबुवा कारुळकर यांचे रामजन्मोत्सवावर प्रवचन-कीर्तन झाले. दुपारी वरसोलीच्या श्री भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या (बुवा रमेश नाईक) भजनाचा कार्यक्रम झाला. मोठय़ाा संख्येने भक्तगण भजन-कीर्तनात रमले होते. सायंकाळपर्यंत भाविक दर्शनासाठी मंदिरात येत होते.
तसेच अलिबाग शहरातील ब्राह्मण आळीत राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा झाला. या वेळी महिलांनी गर्दी केली होती. येथे ही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील नवखार, रेवस, आवास, रांजणपाडा येथेही रामजन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम पार पडले. रेवस कोळी वाडय़ात जन्मोत्सवापूर्वी सप्ताहाची जुनी परंपरा आजही सुरू आहे. या वर्षीही येथे रामनवमी साजरी झाली. आगरी, कोळी, माळी समाजातील लोकांचे राम मंदिर श्रद्धास्थान आहे.
मुरूड तालुक्यातील एकदरा, सावली मिठागर यासह जिल्ह्य़ाच्या अनेक भागात रामजन्मोत्सव मोठय़ा थाटात साजरा झाला. दुपारी जन्मोत्सव तर संध्याकाळी पालखी मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram navami celebration in raigad
First published on: 16-04-2016 at 01:00 IST