आठवले यांचा भाजपविरोधी सूर

मुंबई : राज्यात शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबतची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर, काँग्रेसही त्यासाठी आग्रही असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

धर्माच्या आधारावर मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यास भाजपने विरोध केला आहे, मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आक्षणाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी भाजपच्या नेमकी उलटी भूमिका घेतली आहे.

विधान परिषदेत नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत आघाडी सरकारची सकारात्मक भूमिका मांडली. तीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असे थोरात यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. राज्यात आघाडी सरकार असताना या पूर्वीच मुस्लीम समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री आठवले विधान भवनात आले होते, त्यावेळी महाविकास आघाडी सरकार मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देणार आहे, आपली काय भूमिका असे विचारले असता, ते म्हणाले की, मंडल आयोगाप्रमाणे मुस्लीम समाजातील जवळपास ८० टक्के वेगवेगळ्या गरीब जातींना आरक्षण मिळते आहे. आणखी काही जातींना आरक्षण मिळणार असेल, तर द्यायला हरकत नाही. महाविकास आघाडी सरकारचे त्यांनी त्याबाबत समर्थन केले.

राज्यसभेसाठी भाजपकडून आठवले यांचे नाव निश्चित

* राज्यसभेसाठी भाजपकडून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. माजी मुख्यमंत्री व  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

* विधान भवनात शुक्रवारी आठवले यांनी राज्यसभा उमेदवारीबाबत फडणवीस यांची भेट घेतली. भाजपबरोबर रिपब्लिकन पक्षाची युती आहे, त्याचबरोबर आपण केंद्र सरकार मध्ये मंत्री असल्यामुळे माझी राज्यसभेची उमेदवारी भाजपने निश्चित केली आहे, असे त्यांनी सांगितले.