महाराष्ट्रात येऊन कोणीही शिवसेनेला आव्हान दिल तर आम्ही त्याला गाडून टाकू असा इशारा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिला आहे. अमित शाह यांच्या लातूरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम यांनी हा इशारा दिला. मोदींची लाट असताना महाराष्ट्रात शिवसेनेचे ६३ आमदार निवडून येणार आले आहेत, आता तर त्यांचं काहीच नाही असाही टोला कदम यांनी लगावला.

रामदास कदमांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यातला वाद किती टोकाला गेला आहे ते दिसून येते आहे. राज्यात युती झाली तर ठीक नाहीतर विरोधीयोंको पटक देंगे असा इशारा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिला होता. त्याच टीकेला आता रामदास कदम यांनी झणझणीत उत्तर दिलं आहे. अमित शाह या ज्या सभेत बोलले तिथेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळाचा नारा दिला होता. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, अशात शिवसेना आणि भाजपामधला वाद पुन्हा समोर आला आहे. लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवा असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. आता आम्हाला आव्हान देणाऱ्यांना गाडून टाकू असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे.