शहरातील बेट व मोहनीराजनगर भागातील नागरिकांनी शनिवारी पाण्यासाठी नगरपालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. संतप्त आंदोलकांनी पालिकेतील मुख्याधिका-यांचे दालन व अन्य कक्षात धुडगूस घातला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला, त्यात पालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक नंदकुमार तांबट यांनी नीलेश काकडे व इतर २५५० जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी दिली.
गोदावरी नदीला दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरात या भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी वाहून गेली. त्यावर अवलंबून असलेल्या बेट व मोहनीराजनगर भागातील पाणीपुरवठा तेव्हापासून बंद आहे. या जलवाहिनीचे काम सुरू असले तरी त्याला गती नाही. अत्यंत धिम्या गतीने हे काम सुरू असून त्यामुळे दोन महिने हे नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. त्यांचा रोष शनिवारी या आंदोलनातून विध्वंसक मार्गाने प्रकट झाला. या भागातील सुमारे ५०० ते ६०० नागरिकांनी पालिकेवर मोर्चा आणला होता, त्याला हिंसक वळण लागले.  
गेल्या दोन महिन्यांपासून या भागाला संजीवनी सहकारी साखर कारखान्यामार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र तो पुरेसा नसल्याने नागरिकांनी वेळोवेळी संबंधित नगरसेवक व पालिका प्रशासनाला अर्जविनंत्या निवेदने दिली. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त नागरिकांचा शनिवारी उद्रेक झाला. मुख्याधिकारी श्याम गोसावी पालिकेत उपस्थित नसल्याने नागरिकांनी टेबल-खुर्च्या, काचेची तावदाने फोडून टाकली. कार्यालयातील रेकॉर्डची फेकाफेक केली, येथील पाण्याचे माठ फोडल्याने त्यांच्या दालनातील कागदपत्रेही पूर्ण भिजली. या वेळी अन्य कोणीही जबाबदार अधिकारी पालिकेत हजर नव्हता अशी तक्रार आंदोलकांनी केली आहे. आंदोलकांची आक्रमकता पाहून अन्य कर्मचा-यांनीही पळ काढला. नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई तेथे उपस्थित नव्हत्या, त्यांचे पती संजय सातभाई हे तेथे हजर होते. त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला, मात्र तोपर्यंत आंदोलक निघून गेले होते.
या प्रकारामुळे कर्मचारी प्रचंड दहशतीखाली होते. त्यांनी नंतर या घटनेचा निषेध करून कामबंद आंदोलन केले.
नाहक आक्रमकता!
येथील नागरिकांची मोठीच अडचण झाली ही गोष्ट खरी आहे, मात्र या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. ठरल्यानुसार आजच ही जलवाहिनी सुरूही करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांनी सांगितले. आजच सायंकाळी ही जलवाहिनी सुरू करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.