सिंधुदुर्ग जिल्ह्यत डंपर चालकांच्या आंदोलनामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बचावासाठी माजी मंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र पुढे आले आहे.

गौण खनिज वाहतुकीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईच्या सत्राविरुद्ध जिल्ह्यतील डंपर चालकांनी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. प्रशासनाने अवाजवी प्रमाणात रॉयल्टी किंवा दंड वसुली चालवली असल्याचा या डंपरचालकांचा आरोप असून त्यावर प्रत्युत्तर म्हणून आपले डंपरच जिल्हा प्रशासनाच्या हवाली करण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामध्ये काँग्रेसबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही स्थानिक नेते सहभागी झाले. याचबरोबर चक्री उपोषणाचाही अवलंब करण्यात आला. मात्र अशा प्रकारे शांततामय मार्गाने आंदोलन करण्यापेक्षा नीतेश राणे गेल्या शनिवारी पोलिसांचे कडे तोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि त्यांनी पुढील पोलीस कारवाई ओढवून घेतली. आंदोलनात सहभागी शिवसेना किंवा राष्ट्रवादी नेत्यांपेक्षा आपले वेगळेपण ठसवण्यासाठी नीतेश यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यतील डंपरमालकांपैकी बहुसंख्य राणे यांचे कार्यकर्ते असल्यामुळेही त्यांना त्यांच्यासाठी जास्त आक्रमक होणे भाग पडल्याचे मानले जाते. माजी मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यतील युवकांना व्यवसाय-रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्याचा नेहमीच दावा केला आहे. त्यामध्ये विविध कामांचे ठेकेदार व या डंपरमालकांचा समावेश आहे. त्यामुळे राणे पिता-पुत्रांना या प्रकरणामध्ये उतरणे भाग पडले आहे.

सर्वच पक्षांचा विरोध

राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र अशा प्रकारे हिंसक मार्गाचा अवलंब न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा गुंता सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र प्रशासनाच्या कारवाईला सर्वच पक्षांचा एकमुखी विरोध आहे.