श्रीवर्धन नगरपालिकेच्या शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आणण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला श्रीवर्धन पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या शिक्षकाला यथेच्छ चोप दिला. इयत्ता आठवीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी गेल्या वर्षी सातवीत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आणण्यासाठी शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी शाळेत गेली होती. त्या वेळी इयत्ता तिसरीच्या वर्गातील शिक्षक विशाल पाटील यांनी वर्गात कुणी नसल्याचे पाहून तिला वर्गात बोलावून घेतले. तिच्या गळ्यात हात टाकून तू खूप सुंदर दिसतेस, तुझा फोटो काढू का? असे म्हणून तिच्या सोबत लज्जास्पद वर्तन केले. झाला प्रकार विद्यार्थिनीने घरी जाऊन रडत रडत आपल्या नातेवाईकांना सांगितला. मुलीची आई व आजी यांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकाला बेदम चोप दिला. या संदर्भात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली.

 

अपंग सेवा केंद्रास बापूराव गोरे स्मृती सेवा पुरस्कार
वार्ताहर, सांगली : सांगलीतील विश्रामबागच्या अपंग सेवा केंद्रास यंदाचा बापूराव गोरे स्मृती सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची घोषणा अध्यक्ष माणिकराव जाधव यांनी केली.अपंगांसाठी कार्य करणाऱ्या अपंग सेवा केंद्रात अपंगांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. अपंगांना व्यवसाय मिळवून देण्याबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या या केंद्रात २७०० अपंग आहेत.