जळगाव : रावेर शहराजवळच्या शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील चार भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घटना  माणुसकीला काळीमा फासणारी असून हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, असे सांगितले. रावेर शहरापासून जवळच असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील एका शेतात शुक्रवारी चार भावंडांची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

गृहमंत्री देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल. तसेच या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे,  माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी सांगितले. त्यातील तिघांचा या घटनेशी निकटचा संबंध असण्याची शक्यता असून शास्त्रीय पुरावे गोळा करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.