पेण अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी पेण पोलिसांनी सोमवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन ऑडिटर अब्दुल बरी खान यांना अटक केली. अलिबाग विशेष न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खान यांच्या अटकेमुळे अर्बन बँक घोटाळ्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खान यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता ४५ झाली आहे.
अब्दुल बरी खान यांनी २००६ ते २००८ या कालावधीत पेण अर्बन बँकेचे ऑडिट केले होते. त्या वेळी त्यांनी बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून मोठा ऑडिट घोटाळा केला होता. त्या बदल्यात खान यांनी बँकेकडून सुमारे सव्वा कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खान यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.
मात्र, उच्च न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही खान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या पाश्र्वभूमीवर पेण पोलिसांनी खान यांना अटक केली. त्यांना अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन ऑडिटर अब्दुल बरी खान यांना पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांना अलिबागच्या विशेष न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खान यांच्या अटकेमुळे बँक घोटाळ्यातील रिझव्‍‌र्ह बँकेचे लागेबांधे समोर येण्यास मदत होईल, असा विश्वास ठेवीदार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.