दहा दिवसांचा अवधी असला तरी, प्रशासनाला आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वेध लागले आहेत. मतमोजणीची जय्यत तयारी झाली असून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी याबाबत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन या प्रक्रियेची माहिती दिली. साधारणपणे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील असा अंदाज आहे.
जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात राज्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दि. १७ एप्रिलला मतदान झाले. मतमोजणी येत्या दि. १६ ला होणार आहे. नगर आणि शिर्डी या जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी नगरला एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. मतदान झाल्यानंतर तेथेच दोन्ही मतदारसंघातील सर्व मतदानयंत्रे संकलित करण्यात आली असून सध्या कडेकोट बंदोबस्तात त्याची निगराणी सुरू आहे. येथेच दि. १६ सकाळी ७ वाजता मतमोजणी सुरू होईल.
नगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नुकतीच याबाबत जिल्ह्य़ातील राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन या प्रक्रियेची माहिती दिली. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी यावेळी उपस्थित होते.
या प्रक्रियेची माहिती देताना कवडे यांनी सांगितले की, दोन्ही लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबल ठेवण्यात येणार असून त्यावर यंत्रावरील मतांची मोजणी होणार असून टपालाने आलेल्या मोजणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलसाठी १ पर्यवेक्षक, एक सहायक, एक निरीक्षक व एक शिपाई अशा चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय दोन निरीक्षक पूर्ण व्यवस्थेचे निरीक्षण करणार असून ते केंद्रीय निरीक्षकांना मदत करतील. तेही मतमोजणीला उपस्थित राहणार आहेत. टेबलनिहाय पडणाऱ्या मतांची एकत्रित बेरीज करून फेरीनिहाय त्याचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी खास फ्लेक्स फलक येथे उभारण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना सकाळी ७ पूर्वीच प्रवेश देण्यात यईल, शिवाय मतमोजणी कक्ष व बाहेरच्या आवारातही व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून येथे नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी मतमोजणी प्रतिनिधींनी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कवडे यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
मतमोजणीची जय्यत तयारी; दुपारी एक वाजेपर्यंत निकाल
दहा दिवसांचा अवधी असला तरी, प्रशासनाला आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वेध लागले आहेत. मतमोजणीची जय्यत तयारी झाली असून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी याबाबत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन या प्रक्रियेची माहिती दिली.
First published on: 05-05-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readiness to voting counting