News Flash

मोसमी पावसाचा प्रवाह क्षीण झाल्याने विदर्भ, मराठवाडय़ात विलंब

विदर्भात येणारा पाऊस मोसमी पावसाच्या दोन प्रवाहातून येतो.

(संग्रहित छायाचित्र)

राखी चव्हाण, नागपूर

मुंबईनंतर अवघ्या आठवडाभरात विदर्भ, मराठवाडय़ाकडे वळणाऱ्या मोसमी पावसाने यंदा पाठ का फिरवली? मोसमी पावसाचा मार्ग तर बदलला नाही ना? अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ येथील नागरिकांच्या मनात आहे. मात्र, मोसमी पावसाच्या नैसर्गिक मार्गात काहीच बदल झालेला नाही, तर यावर्षी सुरुवातीपासूनच त्याचा प्रवाह क्षीण झाला आहे. मुंबईकडून विदर्भ, मराठवाडय़ाकडे वळताना तो खंडित झाला आहे. हवामान अभ्यासकांनी सांगितलेली ही कारणे पटणारी असली, तरीही शेतकऱ्यावर कोसळणाऱ्या संकटावर मात्र कुणाकडेही उत्तर नाही.

विदर्भात येणारा पाऊस मोसमी पावसाच्या दोन प्रवाहातून येतो. पश्चिमेकडून येणारे नैऋत्य मोसमी वारे आणि पश्चिम बंगालची धारा. ही धारा विदर्भाला अगदी जवळ पडते, पण तरीही यावर्षी पश्चिम बंगालकडून छत्तीसगडमार्गे येणाऱ्या पावसानेही पाठ फिरवली आहे. यावर्षी किंवा मागील एक-दोन वर्षांचे चित्र पाहिले तर पश्चिमेकडील मोसमी पाऊस मुळातच कमी झाल्याने तो पाऊस आपल्याकडे नाही. त्यामुळेच मराठवाडा, पश्चिम विदर्भात पाऊस कमी पडत आहे. भंडारा-गोंदिया, बालाघाट-छिंदवाडाचा जो भाग आहे, तिकडून बंगालची धारा असल्याने थोडाफार पाऊस आहे. मात्र, यावेळी दोन्हीही प्रवाह कमजोर आहेत. सध्या विदर्भात पडणारा पाऊस हा गडगडाटी आहे आणि मोसमी पाऊस कधीच गडगडाटी नसतो. हा पाऊस स्थानिक आहे. आद्र्रता खूप आहे आणि तापमानही वाढले आहे. त्यामुळे सगळीकडे गडगडाटी पाऊस होत आहे. हा मुंबईहून येणारा मोसमी पाऊस नाही. कारण मोसमी पाऊस रेशमासारखा असतो. तो मुंबईवरून निघून सह्य़ाद्री पार करत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा पार करून मग तो विदर्भात येतो. हा मोसमी पाऊस खंडित झाला आहे. विदर्भात आता पडणाऱ्या पावसाशी मुंबईच्या पावसाचा संबंध नाही. मोसमी पाऊस खंडित तेव्हा होतो, जेव्हा आसाममध्ये पूर येतो. तो हिमालयाच्या पायथ्याशी जातो, तिथेही पाऊस पडतो. नेपाळमध्ये पाऊस पडला की बिहारच्या कोसी नदीला पूर येतो. मागील आठवडय़ात ही पुरस्थिती अनुभवली आहे. आता तमिळनाडूतही पाऊस पडत आहे, पण या ठिकाणी हा पावसाचा ऋतू नाही. तमिळनाडूत नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये परतीचा मोसमी पाऊस असतो. मुंबई, कोकणात पाऊस आणि इतर भाग कोरडे ठणठणीत ही लक्षणे खंडित होणाऱ्या मोसमी पावसाची आहेत. मोसमी पावसाचे सात आठवडे लोटले आहेत. आणखी सात आठवडे बाकी आहेत. १५ सप्टेंबरपासून मोसमी पाऊस माघार घ्यायला लागतो. आतापर्यंत केवळ २०-२२ टक्केच पाऊस पडला आहे. १२० टक्के पाऊस पडला तरच धरणे भरतील आणि पुढच्या आठवडय़ात हा उर्वरित १०० टक्के पाऊस पडेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे ही तूट पुढे वाढत जाणार आहे.

मोसमी पाऊस हा पावसाच्या आगमनाचा जुना प्रकार आहे. कालिदासांनी जेव्हा मेघदूत लिहिले तेव्हा विदर्भाचाच संदर्भ त्यांनी दिला. चौथ्या शतकात त्यांनी ते लिहिले, त्यावेळीही विदर्भात चांगला पाऊस पडत होता हे उघड आहे. कालिदासांना मोसमी पावसाच्या जितक्या गोष्टी त्यावेळी अवगत झाल्या, त्यावेळी त्यातील बरेचसे प्रश्न अजूनही तसेच आहेत. ते सुटलेले नाहीत. चांगले रडार मिळाले, स्वयंचलित हवामान ठिकाण असले म्हणजे अंदाज चांगले मिळतील आणि सारीच गणिते सुटतील असे नाही. शास्त्रज्ञांच्याही काही समस्या असतात, त्यांच्याही सीमा असतात. मोसमी पावसाचेही असेच असते. निसर्गाचेही जे नियम आहेत, ते आपल्याला अजून समजलेले नाहीत, हे आपण मान्य करायला हवे.

– डॉ. रंजन केळकर, सेवानिवृत्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

विदर्भात जंगल आहे, त्यामुळे पाऊस पडायलाच हवा असे नाही. कारण झाडे असून चालत नाही, आकाशात ढग असावे लागतात. ढगांची पेरणीच होत नसेल तर घनदाट जंगल असूनही काही उपयोग नाही. पश्चिमेकडून येणारा मोसमी पाऊस यावेळी विदर्भात धडकला नाही. मोसमी पावसाच्या ऐन आगमनाच्यावेळी वायू नावाचे वादळ आणि अलनिनोचे सक्रिय होणे अशी दोन कारणे दिली जातात. मात्र, वायूसारख्या छोटय़ा वादळाचे कारण सयुक्तिक वाटत नाही. तर अलनिनोमुळे मात्र मोसमी पावसावर निश्चितच परिणाम झालेला आहे.

-प्रा. योगेश दुधपचारे, हवामान अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 4:57 am

Web Title: reason behind rain delay in vidarbha marathwada zws 70
Next Stories
1 गाव विकत घ्या..!
2 ‘पोल्ट्री’ व्यवसाय आर्थिक अडचणीत!
3 मातृत्वाची आस ‘टेस्ट टय़ूब’ बेबीद्वारे पूर्ण
Just Now!
X