‘केजरीवालांचा हुकूमशाह झालाय’ अशी टीका करून आम आदमी पक्षाविरोधात बंड पुकारणारे दिल्लीचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी रविवारी सकाळी राळेगणसिद्घीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली. या वेळी केजरीवाल सरकारविरोधात येत्या २७ तारखेपासून सुरू करण्यात येणारे बेमुदत उपोषण काही काळ थांबून करण्याचा सल्ला हजारे यांनी बिन्नी यांना देतानाच त्यांच्यामधील मतभेदांबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे उपोषण काही काळ स्थगित केल्याची घोषणा बिन्नी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, ७०० लिटर पाण्याच्या आश्वासनास हरताळ फासला, वीजबिलांबाबतही फसवणूक करण्यात आल्याचे सांगत बिन्नी यांनी केजरीवाल यांच्या कार्यपद्घतीवर अलीकडेच जोरदार हल्ला चढविला होता. मंत्रिपदाची संधी न दिल्याने बिन्नी हे नाराजच होते.
दिल्लीतील राजकीय घटनांची माहिती बिन्नी यांनी हजारे यांना दिली व सरकारच्या धोरणाविरोधात उपोषण करणार असल्याचेही त्यांनी हजारे यांना सांगितले. त्यावर अण्णा म्हणाले की, केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारचे चांगले काम सुरू असून त्याचे दृश्य परिणाम पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. बिन्नी व केजरीवाल यांच्यातील मतभेदांबाबत आपण केजरीवाल यांच्याशी चर्चा करून दोघांतील मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही अण्णांनी चर्चेदरम्यान दिले. बेमुदत उपोषण करण्यासाठी काही काळ थांबण्याचा सल्लाही हजारे यांनी दिला. त्यावर आपण अण्णांचा सल्ला शिरोधार्ह मानून उपोषण स्थगित करीत असल्याचे बिन्नी यांनी जाहीर केले.