शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमप्रकरणे, व्यसनाधीनतेतून व कौटुंबिक कलहातून होत असल्याचे वादग्रस्त विधान केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी केले. हे विधान संतापजनक असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. या विधानाचा निषेध करतानाच या प्रकरणी सभागृहात जाब विचारला जाईल. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, ते मौन का बाळगत आहेत, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते खासदार राजीव सातव रविवारी केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक अडीच हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या असल्याचे केंद्रीय अहवालात म्हटले आहे. सभागृहात मात्र हा आकडा फक्त तीन सांगण्यात आला, याकडे सातव यांनी या वेळी लक्ष वेधले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या साठी काँग्रेसतर्फे आंदोलनही करण्यात आले. परंतु सरकारने त्याची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी सरकारचा दृष्टिकोन असंवेदनशील असल्याने सभागृहात यावर जाब विचारणार असल्याचे सातव म्हणाले.