लॉकडाउनच्या काळात नागरिकांना वीज कंपन्यांकडून जास्तीची वीज बिल देण्यात आली होती. वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी मनसेनं राज्यभरात आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं तशी घोषणा केली होती. मात्र, नंतर पुन्हा घुमजाव करत वीज बिल माफी देणार नसल्याचं सांगितलं. या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गौप्यस्फोट केला आहे.

“वीज बिलाबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षानं केलं. भाजपा काय पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खास करून नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की, त्यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं. वीज कंपन्यांकडून जी बिलं येताहेत, ती प्रत्येकाला येत आहे. लॉकडाउनमध्ये तुम्हाला त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून नागरिकांना पिळणार असाल, तर कसं होईल. सरकारमधील मंत्री म्हणाले होते, कपात करून. नंतर एकदम घुमजाव झालं,” असं राज ठाकरे म्हणाले.

“या मुद्द्यावर राज्यपालांना भेटायला गेलो. राज्यपालांनी शरद पवार यांना बोलायला सांगितलं, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा. ते पत्र मला पाठवा. त्यामध्ये अदानी असतील, एमएसईबी असो वा टाटा, मी त्यांच्याशी बोलतो, असं पवार म्हणाले होते. मग पाच सहा दिवसांनी मला असं कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर सरकारकडं असं आलं की, वीज बिल माफ केलं जाणार नाही,” असं म्हणत राज ठाकरे यांनी पवार-अदानी बैठकीबद्दल शंका व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुख्यमंत्री वा इतर सरकारी लोकं तुमच्याकडे येतात, त्यावेळी त्यांना हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आंदोलन केल्यावर तुम्ही केसेस टाकता. तुम्ही वीजदर माफही करत नाही आहात. लोकांना भरमसाठ बिलं भरायला सांगत आहात. कुणासाठी चालू आहे हे सगळं?”, असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला. वीज खंडित करण्याच्या निर्णयावर राज म्हणाले,”या लोकांचा निर्दयीपणा मला समजतंच नाहीये. एकतर लोकांना पिळायचं वर निर्दयीपणे वागायचं. पैशांचा विचार नाही करायचा. कशाचा विचार करायचा नाही आणि वीज बिल माफ करणार नाही हा निर्णय कंपन्यांसोबत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेणदेणं झाल्याशिवाय हे झालं नसेल. सगळ्या कंपन्यांना पाठिंशी घालण्याचं काम सरकार करत आहे,” असा आरोपही राज यांनी केला.