वेरुळ आणि अजिंठय़ास येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यावरणपूरक आराम बस देण्याची योजना प्रायोगिकतेत अडकली आहे. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ग्रीन बस’ चा प्रयोग यशस्वी झाल्यास हा प्रयोग अजिंठय़ात पुन्हा सुरू होऊ शकेल. संपूर्ण बॅटरीवर चालणाऱ्या या गाडय़ा चढ रस्त्यावर कशा व किती टिकतात, याची चाचणी राष्ट्रीय उद्यानात होईल. तेथील यशस्वितेवर ग्रीन बसचा प्रयोग अजिंठा व वेरुळमध्ये सुरू होऊ शकेल. मेगा पार्क योजनेतील महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा उपक्रम अजूनही सुरू झाला नाही.
पर्यटनासाठी केंद्र सरकारने २३ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर केला. पहिल्या हप्त्याचे ४ कोटी ६१ लाख रुपये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाकडे आल्यानंतर त्या अनुषंगाने कोणती कामे करायची, याचे आराखडे तयार केले गेले. पुरातत्त्व विभागाकडून केली जाणारी विकासकामे मात्र लालफितीत अडकली. बीबी का मकबरा येथे विद्युतीकरण, पर्यटकांसाठी वाहनतळ उभारणे व पिण्याच्या पाण्याची सोय यासाठी ३ कोटी २० लाख निधी आला. मात्र, अजूनही काम सुरू झाले नाही.
निविदा प्रकाशित झाल्याचे सांगितले जाते. नव्यानेच आचारसंहितेच्याही अडचणी असल्याने बहुतांश कामे कासवगतीने सुरू आहेत. बनीबेगम बागेसाठी राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याला दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हे कामही निविदेच्या पातळीवरच आहे. दौलताबाद किल्ल्यावर वाहनतळ व पिण्याच्या पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात तरतूद करण्यात आली. मात्र, तरतुदींचा आकडा राष्ट्रीय सांस्कृतिक फंडातून फिरत असल्याने घोडे अडले.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आलेला पैसा राष्ट्रीय सांस्कृतिक फंडात जातो आणि प्रत्येक कामासाठी त्या निधीतूनच खर्च करता येऊ शकतो. प्रशासकीय पातळीवरील हा द्राविडी प्राणायाम पूर्ण न झाल्याने कामे अडकली आहेत. महापालिकेकडे दिलेली काही कामे सुरू केल्याचे पर्यटन विकास मंडळाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. रोज गार्डन व सुशोभिकरणाची कामे हाती घेतली आहेत.
कलाग्रामच्या जागेचा वाद मिटला
शहरात उभारलेल्या कलाग्रामची जागा कोणाची, यावरून गेल्या काही वर्षांपासून वाद होता. मूळ जागा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाची होती. त्यांनी ती महापालिकेकडे दिली. कलाग्राम विकसित करण्यासाठी महापालिकेने औद्योगिक विकास महामंडळाला न विचारता ही जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिली. मात्र, जागेची मूळ मालकी एमआयडीसीकडे असल्याने विकासाचे नवे आराखडे गुंडाळून ठेवण्यात आले. पर्यटन महामंडळाने कलाग्रामच्या जागेसाठी १ कोटी ७६ लाख रुपये नुकतेच एमआयडीसीकडे वर्ग केले. त्यास महापालिकेनेही संमती दिली. त्यामुळे कलाग्रामच्या जागेचा वाद आता मिटला आहे.