मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी

वाई : साताऱ्यात ‘जम्बो कोविड सेंटर’ परिसरातील रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिरखुर्माचे वाटप करून मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली.

सर्व समाजाला एकत्र करून त्यांची सेवा करणे हा ईदचा अर्थ आहे. समाजामध्ये समता व बंधुता प्रस्थापित व्हावी हा या सणाचा उद्देश आहे. आज करोनाने सर्व जण भीतीच्या छायेत आहेत. रुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी प्रयत्न करत आहेत. तर रुग्णांचे नातेवाईकही हालअपेष्टा सहन करत रुग्ण बरा होण्याची वाट पाहत आहेत. आज रमजान ईद असल्याने सर्वत्र मोठय़ा उत्साहाचे वातावरण असते. मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारीपाजारी ईदच्या शुभेच्छा देत शिरखुर्मा खाण्यासाठी घरी जात असतात. मागील वर्षी व या वर्षी ईद टाळेबंदीमध्ये आल्याने करोना प्रादुर्भाव यांच्या पाश्र्वभूमीवर कोणाकडेही जाता येत नाही. फक्त ऑनलाइन व मोबाइलवरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

साताऱ्यातील मुस्लिम समाजाच्या युवकांनी व ज्येष्ठांनी सातारा जम्बो रुग्णालय व इतर रुग्णालयाच्या परिसरात थांबून राहिलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना डॉक्टर परिचारिका आरोग्य कर्मचाऱ्यांना या सर्वांना शिरखुर्माचे वाटप करून ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी सर्व नातेवाइकांना युवकांना आरोग्य सेवकांना साताऱ्यातील खिदमत ए खल्क कमिटीच्या वतीने रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. या युवकांनी नातेवाइकांना धीर देत आपला रुग्ण लवकरात लवकर बरा होईल असा आशावाद दिला. या वेळी अमिरसाहेब अनिस तांबोळी, सादिकभाई शेख, साजिद शेख व इतरांनी सहभाग नोंदविल्यामुळे कोविड सेंटरच्या परिसरातील वातावरण एकदम बदलून गेले होते.