News Flash

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार; ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णवाढ झाली. त्यामुळे बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यातच काळाबाजारात इंजेक्शनची विक्री होत असल्याचे अनेक प्रकार राज्यात उघडकीस आले. त्यानंतर राज्य सरकारने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन पद्धतीनी रेमडेसिवीर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात खासगी कोविड रुग्णालयांना दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. टोपे म्हणाले,”रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीनं हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट असणार असून, त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

“जिल्हाधिकारी खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्यानं काळाबाजार होणार नाही. यातून खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल. रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही,” असंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी मोठं पाऊल

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. मात्र कोणतंही राज्य यासंदर्भात मदत करायला तयार नसून, आपक्याकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल हाच मार्ग आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ब्रेक द चैन संदर्भातील आवाहनाला सर्वांनी घरी राहून सहकार्य करावं,” असंही टोपे म्हणाले. “सध्या ऑक्सिजनची कमतरता असून जालन्यातील घनसावंगी येथे येत्या १५ दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेणारा प्लांट उभारत असून यात यश मिळालं तर संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील आणि लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मिळेल,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 3:14 pm

Web Title: remdesivir injection shortage remdesivir injection in maharashtra maharashtra govt rajesh tope bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …तर लॉकडाउनशिवाय पर्याय तरी काय उरतो? – राज ठाकरे
2 उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरे; मोदींना पत्र लिहून केल्या पाच प्रमुख मागण्या
3 राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Just Now!
X