वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा जगण्याचा संघर्ष सोमवारी पहाटे थांबला. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्तरांतून मागणी होतेय. तर अनेकांनी चीड व्यक्त केली आहे. वाईट व्यक्तींना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार वेळ दिला जातो, अशा शब्दांत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी संताप व्यक्त केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, “अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कितीही कठोर कायदा केला तर त्याचा काही फरक पडत नाही असं दिसतंय. समाजातील पुरुषी मानसिकता ही ‘नाही’ म्हणणाऱ्या स्त्रियांना मानतच नाही. या घटनांना आळा कसा घालायचा हेही कळेनासं झालं आहे. कारण छोट्या घटनांची जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा महिलांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही. एखादा मुलगा माझा पाठलाग करतोय अशी तक्रार जर महिलेनं पोलिसांकडे केली तर त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण अशा घटनांची ही पहिली पायरी आहे.”

लैंगिक शिक्षणासोबत शाळा-कॉलेजमध्ये मुलींकडे बघण्याचा मुलांचा दृष्टीकोन कसा असायला पाहिजे हेसुद्धा शिकवायला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं. मुलीचा होकार म्हणजे काय आणि तो किती महत्त्वाचा आहे याबद्दल बोललं गेलं पाहिजे असं त्या म्हणाल्या.

आणखी वाचा – हैदराबाद पोलिसांचं समर्थन करण्याची वेळ येऊ नये हीच न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती – मकरंद अनासपुरे

रेणुका शहाणे यांनी निर्भया प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी लागणाऱ्या विलंबाचाही निषेध व्यक्त केला. आपल्याकडे वाईट माणसांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार वेळ दिला जातो. समाजात असा काळ बघायला मिळेल, जेव्हा असे आरोपी जर सामान्यांच्या हाती लागले तर त्यांचा खूनच होईल. कारण न्याय मिळण्यास विलंब लागतो, अशा शब्दांत त्यांनी चीड व्यक्त केली.