कोल्हापूर : धुवांधार पावसाचा फटका कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या चंदगड तालुक्याला बसला आहे. कोवाड बाजारपेठ आणि परिसरातील गावातील लोकांना स्थलांतर करण्यासाठी कार्यरत बचाव पथकाला शुक्रवारी केवळ दोरखंडाचा वापर करावा लागला. आपत्कालीन सेवेसाठी बोट गावात उपलब्ध असली तरी अंतर्गत वादामुळे ती वेळेवर उपलब्ध झाली नसल्याने प्रशासनातील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने दिसून आला.

‘स्वामी’कार रणजित देसाई यांचे कोवाड गाव ही चंदगड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. गतवर्षी ताम्रपर्णी नदीच्या महापुरामुळे या बाजारपेठेचा मोठा फटका बसला होता. यंदाही पुरामुळे बाजारपेठ पाण्याखाली गेल्यामुळे कोवाड मधील दुकाने दोन दिवस बंद आहेत. शेजारच्या काही गावांनाही पुराचा फटका बसला आहे. परिसरातील बरीच कुटुंबे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत.

बचाव पथक मदतीला

स्थलांतर होता न आलेल्या लोकांच्या मदतीसाठी आज ‘प्रथमदर्शी आपत्कालीन सेवा संस्था’ (पास) या सेवाभावी पथकाने बचाव कार्य केले. पथकातील प्रवीण गणाचारी, विवेक नावडकर, विवेकानंद मनवाडकर, श्रीनाथ सुतार, सतीश जोशिलकर आदी सहकाऱ्यांनी कमरे इतक्या पाण्यात उतरून दोरखंडाचा वापर करून लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न केले. न्यू हॉटेल गारवा याठिकाणी आठ फूट पाणी होते. कोवाडला जायचे झाले तर पोहून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पास बचाव पथकातील जवानांनी मदत करुन लोकांना सुरक्षित ठिकाणी आणले.

गाफील यंत्रणा

महापूराची परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीकडे बोट असली तरी ती तांत्रिक कारणामुळे ग्रामपंचायतीकडून बचाव पथकाला देता आली नाही. प्रांत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तरीही जीवावर उदार होऊन बचाव पथक काम करीत असताना प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आपत्कालीन सेवेसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असल्याचे ढोल वाजवले जात आहेत. एनडीआरएफचे पथक तैनात केले असले तरी चंदगड तालुक्यात मात्र समन्वयाअभावी आपत्कालीन यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.