चक्रीवादळाचा इशारा; मच्छीमारांना लाखोंचा भरुदड

अरबी समुद्रात ‘कायर’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने मासेमारीसाठी गेलेल्या वसई व पालघर तालुक्याच्या बंदरांतील मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत. तर काही बोटींनी गुजरात तथा दीवच्या किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. या वादळाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार असल्यामुळे तोपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मासेमारीची फेरी अर्धवट सोडून द्यावी लागणार असल्याने मोठा फटका मच्छीमारांना बसणार आहे.

वसई तालुक्यातील नायगाव, खोचिवडे, वसई, अर्नाळा या बंदरातील शेकडो मच्छीमार सोमवारी मतदानानंतर मासेमारीकरिता गेले होते. याचवेळी हवामान खात्याकडून या वादळाचा इशारा आल्यावर मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी किनाऱ्यावर परतू लागल्या आहेत. तर काही बोटींनी सुरक्षेसाठी गुजरात तथा दीवच्या किनाऱ्याच्या दिशेने गेल्या आहेत. इशारा मिळण्याआधी आम्ही मासेमारीसाठी इच्छितस्थळी पोहोचलो होतो. ज्याठिकाणी मासेमारी करतो तिथून वसईच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी २४ तासांचा अवधी लागतो. मात्र याठिकाणाहून गुजरात तथा दीवचा किनारा अवघ्या दोन तासांवर आहे. वसईला परत येताना परतीच्या प्रवासात वादळामुळे काही अनुचित घडू नये, यासाठी आम्ही दीवच्या किनाऱ्यावर बोटी आणल्या, अशी माहिती वसईतील ‘गोल्डन किंग’ बोटीचे नाखवा रणजित बुरखाव यांनी भ्रमणध्वनीवरून दिली. रणजित बुरखाव त्यांच्या खलाशांसह दीवच्या किनाऱ्यावर सुखरूप आहेत. वादळ निवळल्यानंतर ते वसईला परत येणार आहेत. गुजरात आणि दीवच्या किनाऱ्यावर वसई, अर्नाळा याठिकाणच्या बोटी नांगरून ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

एका फेरीचा खर्च वाया

मासेमारीकरिता खोल समुद्रात जाताना मच्छीमारांना सात ते आठ दिवसांच्या एका फेरीकरिता डिझेल, बर्फ, रेशन, खलाशांचे वेतन इत्यादीकरिता जवळपास एक ते दीड लाखाचा खर्च येतो. एका बोटीवर बारा ते पंधरा खलाशी असतात. प्रत्येक खलाशाला १२ ते १५ हजार रुपये वेतन द्यावे लागते. तो खर्च ७० ते ८० हजार रुपये होतो. ८०० लिटर डिझेल, ५ ते ६ टन बर्फ आणि शिधासामग्री असा हा एका फेरीचा दीड लाख रुपयांचा खर्च असतो. वादळामुळे मासेमारी बोटी परत आल्यामुळे फेरीचा खर्च वाया गेला आहे. आता वादळ शमल्यावर नव्याने खर्च करून मासेमारीकरिता जावे लागणार आहे, असे अर्नेस्ट मस्तान या वसईतील मच्छीमाराने सांगितले.

हवामान खात्याकडून वादळाचा इशारा आल्यानंतर आम्ही ताबडतोब मच्छीमारांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. साधारणात: २४ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या काळात कायर चक्रीवादळाचा प्रभाव समुद्रात राहणार आहे. या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, याबाबतचा इशारा आम्ही मच्छीमारांपर्यंत पोहोचवला आहे. -युवराज चौगुले, प्रादेशिक उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग