विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील महसूल विभागाचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयामधील कामकाज ठप्प झाले आहे.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात भयाण शांतता पसरली होती. नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या विभागातही शुकशुकाट अनुभवायला मिळत होता. याला निमित्त होते ते कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महसूल विभागाचे कर्मचारी आजपासून संपावर गेले आहे. त्यामुळे महसूल विभागाशी निगडित सर्व तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. रायगड जिल्ह्य़ातील साडेसहाशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहे.
महसूल विभागातील नायब तहसीलदारांची सर्व पदे पदोन्नतीने भरावीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी पदासांठी महसूल कर्मचाऱ्यांसाठी ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात याव्या. राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, महसूल विभागातील चालकांना जादा कामासाठी विशेष भत्ता द्यावा. महसूल विभागातील व्यपगत झालेली पदे पुनरुज्जीवित करण्यात यावीत, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावीत, कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करावा, शासनाच्या नवीन योजनांसाठी स्वतंत्र्य कर्मचारीवर्ग देण्यात यावा, त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यासाठी खनिकर्म निरीक्षकांची पदे निर्माण करण्यात यावी आपत्ती व्यवस्थापक कक्षासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्ग नेमण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. वेळोवेळी मागण्या करूनही शासनस्तरावर त्यांची दखल घेतली जात नसल्याने हे पाऊल उचलावे लागले असल्याचे रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत कवळे यांनी सांगितले.
या संपात अव्वल कारकून, लिपिक, शिपाई, कोतवाल यांच्यासह पदोन्नतीने नायब तहसीलदार झालेले अधिकारीही सहभागी झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या संपात जिल्ह्य़ातील साडेसहाशे महसूल कर्मचारी सहभागी झाले असून संप १०० टक्के यशस्वी झाल्याचे कवळे यांनी सांगितले आहे. आपल्या मागण्यांचा शासन जोपर्यंत सहानुभूतिपूर्वक विचार करत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कवळे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या या राज्यपातळीवरील आहेत, याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, जनतेचे काम थांबू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरू करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी केले आहे.