नाणार प्रकल्पाला स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांनी समर्थनाची भूमिका घेतलेली असतानाच या प्रकल्पासाठी सुमारे सत्तर टक्के जमीनमालकांच्या लेखी संमतीसह नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी दिली आहे.

पूर्वीच्या प्रस्तावात समाविष्ट असलेल्या नाणार, दत्तवाडी व पाळेकरवाडी या गावांना या प्रस्तावातून वगळण्यात आले असून विलये गाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.  या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर शासनाने या प्रस्तावाचा विचार करून नियोजित प्रकल्प राजापूर तालुक्यात घोषित करावा, अशी मागणी आंबेरकर यांनी केली आहे.

या नवीन प्रस्तावाप्रमाणे विस्थापनाचे प्रमाणही  नगण्य असणार आहे. सुधारित प्रस्तावानुसार एकूण ११ हजार एकरवर असणाऱ्या या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष प्रकल्पबाधित लोकसंख्या केवळ ३५६ असणार आहे.   प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित प्रस्तावामध्ये दोन वाडय़ांतील केवळ ११५ कुटुंबे बाधित असणार आहेत. त्यामुळे विस्थापन नगण्य असणार आहे. सुधारित क्षेत्रात आंबा लागवडीखालील क्षेत्र १९ टक्के व नैसर्गिक ग्रीन लागवड केवळ १० टक्के तर मोकळी जागा सुमारे ७१ टक्के राहील, असे या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.