लोकसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्यात, या साठी यंत्रणेकडून संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार केली जात असतानाच शहरात शुक्रवारी एका परप्रांतीयाकडून पाच देशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली. कत्तासिंग लक्ष्मीनारायण लोधी (वय ३८) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
वाळुज औद्यागिक वसाहतीच्या ट्रक टर्मिनल्सवर त्याने पिस्तुले विक्रीसाठी आणली होती. गावठी पिस्तुलाची विक्री होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटे सापळा लावला होता. खाकी रंगाच्या रेग्झीनच्या पिशवीत पिस्तूल घेऊन लोधी पोहोचला, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या पिशवीतून ९ एमएम व ७.५ एमएम आकाराची गोळी झाडता येईल, अशी पाच पिस्तुले, १२ काडतुसे व ४ काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या. पोलिसांच्या अंदाजानुसार हा ऐवज ८५ हजार ६४० रुपयांचा आहे. वाळूज औद्योगिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पकडलेला आरोपी मध्य प्रदेशच्या िभड जिल्ह्यातील मेहगावचा रहिवासी असून, तो ही पिस्तुले कोणाला विकणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाहनांची कसून तपासणीची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
पावणेदोन हजारांवर शस्त्रे ताब्यात घेण्याचा प्रस्ताव
लोकसभेच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात १ हजार ८०९ शस्त्रे ताब्यात घेण्याचा प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. शहरातील १ हजार २८६, तर ग्रामीण भागातील ५२३ शस्त्रे ताब्यात करावीत की नाहीत, या साठी लवकरच बठक होणार आहे. १५० शस्त्रे आतापर्यंत जमा करण्यात आली आहेत.