इतिहासात नोंद असलेल्या पालघर तालुक्यातील वाघोबा खिंड परिसरातील काळदुर्ग किल्लावजा गडी  (टेहळणी चौकी) हा सुमारे १५०० फुट उंचीचा खडतर किल्ला एका साडेचार वर्षांच्या चिमुकल्याने अवघ्या दोन तासांच्या चढाईने सर केला आहे.

पालघरमधील रेयांश दारुवाले या साडेचार वर्षांच्या मुलाने गतवर्षी धोडप किल्ला सर केल्यानंतर आता पालघर तालुक्यातील काळदुर्ग हा किल्ला अवघ्या दोन तासात सर केला. इतिहासात नोंद असलेली ही गडी पूर्वी शत्रू आल्यानंतर मावळ्यांना इशारा देण्यासाठी टेहळणी चौकी होती असे सांगितले जाते. दूरचित्र वाहिनीवर पाहिलेल्या संभाजी या मालिकेमधून त्याला प्रोत्साहन मिळाल्याचे त्याचे वडील म्हणतात. रियांश हा भारतातील बहुधा पहिलाच बाल गिर्यारोहक असावा. त्याने नाशिकनजीक चांदवड येथे असलेल्या सातमाळा पर्वतरांगांतील धोडप हा दुसऱ्या क्रमांकाचा उंच व डोंगर श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा किल्ला न थकता सर केला आहे व आता काळदुर्ग सर केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. काळदुर्ग किल्ला चढण्यासाठी तो रविवारी वाघोबा खिंड परिसरातून आपले वडील व त्यांचे मित्र यांच्या सोबतीने सकाळी साडेसात वाजता निघाला. खडतर वाटा समोर असतानाही तो न डगमगता अवघ्या दोन तासांमध्ये माथ्यावर पोचला. तिथे त्याने शिवाजी महाराजांचे प्रतीक म्हणून भगवा झेंडा रोवला.