अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला NCB ने मंगळवारी अटक केली. अटक झाल्यानंतर रियाची रवानगी भायखळा येथील तुरुंगात केली आहे. याच तुरुंगात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीदेखील असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार,अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली मंगळवारी अटक करण्यात आली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. यात सुशांतचा नोकर दीपेश सावंत याची चौकशी केल्यानंतर रियाचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर रियाची चौकशी करण्यात आली. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी रियाला अटक करण्यात आली. त्यानंतर तिची भायखळा येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याच तुरुंगात शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीदेखील आहेत. विशेष म्हणजे या तुरुंगात इंद्राणी मुखर्जी यांची लोकप्रियता असल्याचं सांगण्यात येत आहे.

२०१७ मध्ये मंजुला या महिला आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर इंद्राणी मुखर्जी यांनी तुरुंगात निदर्शने केली होती. तेव्हापासून तुरुंगात त्यांची लोकप्रियता निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. या तुरुंगात इंद्राणीसह २५० आरोपी असल्याचं सांगण्यात येत. तसंच तुरुंगात येणाऱ्या प्रत्येक नव्या आरोपीची इंद्राणी मुखर्जी भेट घेतात, असंही सांगितलं जात आहे.