औद्योगिक वसाहतीमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या कामगारांची वर्दळ कायम

पालघर : जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन तसेच सलग उत्पादन प्रक्रिया करण्याच्या उद्योगांना राज्य सरकारने दिलेल्या मुभेचा गैरफायदा घेऊन तारापूरमधील अनेक उद्योगांनी उत्पादन सुरू करण्याची परवानगी प्राप्त केली आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमधील विविध रस्त्यांवर सकाळी व सायंकाळी पूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ  लागली आहे. विशेष करून बोईसर बाहेरून येणाऱ्या कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने अशा नागरिकांकडून करोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे.

औषधनिर्मिती व अत्यावश्यक सेवेशी निगडित उद्योगांना उत्पादन सुरू ठेवण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. त्याचप्रमाणे सलग उत्पादन प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना कोणतीही विशेष परवानगी घेण्याची गरज नसल्याचे परिपत्रक राज्य सरकारने ३ एप्रिल रोजी प्रसिद्ध केल्याने त्याचा आधार घेऊन अनेक उद्योग सुरू झाले आहेत. त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी पाळावयाच्या संकेतांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. काही मोठय़ा उद्योगांनी बोईसर बाहेरच्या आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत आणण्यासाठी विविध ठिकाणांहून बस पाठवण्यात येत असून त्यामधून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य पद्धतीने तपासणी होत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करोना संसर्ग होण्याची भीती कामगार वर्गामध्ये आहे.

सलग उत्पादन प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाने तसेच अत्यावश्यक सेवेतील वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांनी २५ टक्के मनुष्यबळावर काम करणे अपेक्षित आहे. मात्र या व इतर नियमांचे तारापूर येथे पालन होत नसल्याचे आरोप होत आहेत. कामावर हजर राहणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी व त्याबाबत उत्पादन सुरू ठेवणाऱ्या उद्योगांचे अहवाल जपून ठेवावा, अशी अपेक्षादेखील व्यक्त होत आहे.

दरम्यान धारावी येथून एका रहिवाशाने मोटरसायकलवरून प्रवास करत आपल्याला नातेवाईकाकडे बोईसर गाठल्याची माहिती समाज माध्यमांवर पसरल्याने एकच घबराट पसरली होती. या व्यक्तीला खोकला झाल्याने आरोग्य पथकाने तपासणी करिता व खबरदारी म्हणून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेतले आहे.

दरम्यान ही व्यक्ती धारावी येथून बोईसपर्यंत कशी पोहोचली हा प्रश्न उपस्थित होत आहे. बोईसर शहराच्या प्रवेश द्वाराजवळ खैरापाडा येथे पोलीस चौकी येथे बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. मात्र दुचाकी स्वार हे तपासणी नाके व पोलिसांच्या तपासणी छावणीमधून निसटत असल्याचे या प्रकारावरून दिसून आले आहे.

नोकरीच्या आशेने वसई-विरारच्या फेऱ्या

सफाळे व केळवे भागातील सुमारे दोन हजार नागरिक हे वसई -विरार महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मात्र करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर गावकऱ्यांनी महानगरपालिकेत कामावर जाण्यास मज्जाव केल्याने यापैकी बहुतांश नागरिकांना नोकरीवरून कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी आपल्याला नोकरीमध्ये पूर्ववत घेतले जाईल असे काहीं तरुणांना आशा असल्याने अशी मंडळी दररोज विरार-वसई येथे दुचाकीवर जात असल्याची माहिती पुढे आली आहे.