जिल्ह्यात शुक्रवारी श्रावणसरी बरसत असल्या तरी तत्पूर्वी झालेल्या पावसामुळे नदी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्याचे लक्ष असलेले राधानगरी धरण आज सकाळी ९८ टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडय़ात (११५ मि.मी. ) पडला आहे.
शुक्रवारी पावसाने उसंत घेतली. पश्चिमेकडील धरक्षेत्रात मात्र पावसाची संततधार कायम होती. यामुळे धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. राधानगरी धरणाचे येत्या काही तासातच स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता आहे. सध्या धरणातून दोन हजार घ.फू. प्रति सेकंद विसर्ग विद्युत निर्मिती करून सोडण्यात आलेला आहे.  राधानगरी धरणाच्या खालील परिसरातही पावसाचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. नदी काठच्या गावातील लोकांनी पुराबाबत दक्षता घ्यावी. तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असा सावधानतेचा इशारा कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि.पां. पाटील यांनी दिला आहे.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ८३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. घटप्रभा, कडवी धरण तसेच कोदे लघु पाटबंधारे धरणे पूर्ण भरलेली आहेत. राधानगरीतून २००० क्यूसेक्स वारणेतून १०९८४, कासारीतून २४०३, कडवीतून ७३४, घटप्रभेतून  ९२४, जांबरेतून १२७१ तर कोदेमधून ७४३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.