हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्य़ाला अतिवृष्टीचा तडाखा बसून दहा दिवसांत १३०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे नागोठणे, रोहा, महाड, पेण, माणगाव, अलिबाग, रसायनी परिसराला पूरस्थितीला सामोरे जावे लागले. महाड आणि नागोठणे परिसरातील बाजार पेठा पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महाडमध्ये जवळपास पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पूरस्थिती होती. सातत्याने येणाऱ्या या पुरांना नद्यांमध्ये साचलेला गाळ कारणीभूत ठरतो आहे. त्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र या संदर्भातील प्रस्ताव दहा वर्षे शासनदरबारी धूळ खात पडला आहे.

रायगड जिल्ह्य़ांत दरवर्षी साधारणपणे सरासरी ३,१४२ मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी दोन महिन्यांतच पावसाने सरासरी गाठली. यातून जवळपास निम्मा पाऊस हा २५ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत पडला. त्यामुळे जिल्ह्य़ातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गाव पाण्याने वेढली गेली. हजारो लोकांना बोटींच्या साह्य़ाने बाहेर काढण्याची वेळ आली. जिल्ह्य़ात महाड, नागोठणे आणि रोहा या परिसराला दर वर्षी या परिस्थितीला सामोरे जावे लागते. याला नद्यांमधील साचलेला गाळ कारणीभूत ठरतो.

जिल्ह्य़ातील नद्या या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्यांचा उगम सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होते. डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी या नद्यांमधून वेगाने खाली येते. त्यामुळे या पाण्यासोबत दगडगोटे वाहून येतात. पावसाळ्यानंतर ते नदीपात्रात साचून राहतात. नदीपात्र उथळ होत जाते. त्यातून नदीकिनाऱ्यांना पावसाळ्यात पूरस्थितीला सामोरे जावे लागते.

२००९ साली जिल्ह्य़ातील सावित्री आणि कुंडलिका नद्यांमधील गाळ काढण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवण्यात आला. सावित्री नदीतील महाड शहरालगत तयार झालेली गाळाची बेटे काढण्यासाठी ७ कोटी ४७ लाख रुपयांचा तर कुंडलिका नदीतील रोहा शहरालगतचा गाळ काढण्यासाठी २ कोटी ८७ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव गेल्या नऊ  वर्षांपासून शासनस्तरावर विचाराधीन आहे. या शिवाय महाड शहरालगत नदीकिनाऱ्याला संरक्षक भिंत उभारण्यासाठी ९ कोटी ३८ लाख रुपयांचा, तर रोहा शहरालगत नदीकिनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारण्यासाठी ५ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी मदत व पुनर्वसन विभागाला सादर करण्यात आले, मात्र त्यावर दहा वर्षांनंतरही ठोस निर्णय झाला नाही.

समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न गरजेचा

कोकणातील बहुतांश शहरे आणि गाव ही नदीकिनारी अथवा डोंगरउतारावर वसलेली असतात. त्यामुळे आता या शहरांना अथवा गावांना स्थलांतरित करणे शक्य नाही. त्यामुळे नद्यांचा गाळ काढणे, नदीवर लहान लहान धरणे बांधून नदीची पातळी नियंत्रित करणे आणि पुरापासून संरक्षणासाठी संरक्षक भिंती उभारणे गरजेचे आहे.

स्थानिक खासदार सुनील तटकरे अर्थमंत्री असताना कोकणातील नद्यांचा गाळ काढण्यासाठी तीन ड्रेझर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांना तो पुरविण्यात येणार होता. मात्र त्यांचे अर्थमंत्रीपद गेले आणि ड्रेझर खरेदी प्रस्तावही लालफितीत अडकला. १९८९ साली पाली तालुक्यातील जांभुळपाडा येथे महापूर आला होता. यानंतर तेथील नदीपात्राचे खोलीकरण करण्यात आले. नदीपात्राभोवती संरक्षक भिंत उभारली गेली. यानंतर तेथील पूरसमस्या जवळपास संपुष्टात आली याकडे लक्ष वेधण्यात आले.

सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी खासगी मालकीच्या या बेटांचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला होता. पण पर्यावरण विभागाच्या हरकतीमुळे हे काम मार्गी लागू शकले नाही. पण आता आम्ही पुन्हा एकदा यासाठी पाठपुरावा करणार आहोत. नदीतील गाळ विनामोबदला काढून तो महामार्ग रुंदीकरणासाठी वापरण्याचे नियोजन केले आहे. ही गाळाची बेटे काढली तर पुढील वर्षी महाडमध्ये पूर येणार नाही

 – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री रायगड

कुंडलिका नदीत संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासाठी नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव टाकून आणि बांधकाम करून नदीचे पात्र अरुंद केले जात आहे. परिणामी कुंडलिका नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. माती भरावामुळे पुलाचे गाळेसुद्धा कमी झाले आहेत. नदी पात्र अरुंद झाल्याने पूरसमस्या अधिक बिकट होते आहे. नदीचे संवर्धन करण्याचा नावाखाली नदीचे अस्तित्वच धोक्यात आणले जात आहे.

– मिलिंद अष्टिवकर, सामाजिक कार्यकर्ते, रोहा