ड्रेनेज, पाणी, रिलायन्सची केबल यामुळे अवघ्या महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली असताना वजनदार नेत्याच्या मुलीच्या लग्नासाठी मात्र २४ तासात विवाहस्थळानजीकचा रस्ता चकचकीत करण्याची किमया सांगली महापालिकेने साधली आहे. याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता या कामासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत कानावर हात ठेवण्याचा प्रताप प्रशासनाकडून घडत आहे.
सांगली, मिरज शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. जलनिस्सारणाची कामे, पाणी पुरवठय़ाची कामे यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी माधवनगर रस्त्यावरील कॉलेज कॉर्नर येथे रस्त्यावर खोदण्यात आलेल्या ७ फुट खड्डयात पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. खड्डयात पडलेली मोटरसायकल काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.
शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असताना रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका गांभीर्याने कार्य करीत असल्याचे कोठेही आढळत नाही. महापालिकेत सत्तांतर होऊन वर्षांचा अवधी झाला तरी विकासकामांच्या केवळ घोषणाच झाल्या. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसने सत्ता हस्तगत केली म्हणून २० कोटींचे बक्षीस दिले. मात्र श्रेय वादावरून या कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. उपनगरात ड्रेनेज योजनेची कामे सुरू असल्याने बहुसंख्य रस्ते उकरण्यात आले आहेत. या पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यांवरून प्रवास करणे दिव्य ठरणार आहे.
महापालिका क्षेत्रातील अशी स्थिती असताना सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणा-या नेत्याच्या मुलीचे लग्न येत्या रविवारी होणार आहे. यासाठी मातब्बर नेतेमंडळींना आग्रहाची निमंत्रणे देण्यात आली आहेत. लग्नाच्या निमित्ताने राजकीय ताकद अजमावण्याचा प्रयत्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होत आहे. या नेत्यांना प्रवासात सांगलीच्या रस्त्याची जाणीव होऊ नये यासाठी २४ तासाच्या अवधीत विवाहस्थळानजीकचे रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांसाठी खड्डे आणि नेत्यांसाठी मात्र कारपेट अशी परिस्थिती कर भरणा-या सांगलीकरांची झाली आहे.
या रस्त्याबाबत महापालिकेचे अभियंता आर.पी.जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रस्ता झाला आहे की नाही, याचीच माहिती उपलब्ध नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. या रस्त्यावर किती खर्च होणार आहे. निविदा निश्चिती झाली का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.