सराईत चोरटय़ांनी सध्या रत्नागिरी शहरात धुमाकूळ घातला असून गेल्या रविवारी रात्री येथील प्रसिद्ध भगवती मंदिरात सुमारे चार लाख रुपयांचे दागिने लांबवल्यानंतर काल रात्री मारुती मंदिर परिसरातील महिला पतपेढीचे ग्रिल तोडून दोन हजार रुपयांची रोकड चोरण्याचा प्रकार घडला आहे.
दरम्यान चिपळूण शहरातही काल रात्री चोरटय़ांनी तीन ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न केले. पण सुदैवाने त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. महिला पतपेढीतून चोरटय़ांनी रोख रकमेबरोबरच इलेक्ट्रॉनिक वजनकाटाही चोरून नेला.
रत्नागिरी शहरात गेले काही महिने चोरटय़ांनी जणू वास्तव्यच केले असून गेल्या महिन्यात येथील जय महाराष्ट्र पतपेढी रात्रीच्या वेळी फोडून सोने आणि रोख रक्कम मिळून तब्बल सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त रकमेचा ऐवज चोरटय़ांनी लुबाडला. त्या घटनेचे अजूनही ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत. गेल्या रविवारी रात्री येथील प्रसिद्ध भगवती मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि ग्रिलचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी देवीच्या मागची चांदीची प्रभावळ, मानदंड आणि दानपेटय़ांमधील रोख रक्कम मिळून सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लांबवला आहे. मात्र हा सर्व प्रकार मंदिरात लावलेल्या सीसी टीव्हीमध्ये चित्रित झाला असून चोरटय़ांबाबत ठोस माहिती हाती आली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. शहरातील बंद फ्लॅट फोडून चोऱ्या करण्याचे प्रकार अधूनमधून घडतच असतात.  या पैकी बहुसंख्य चोऱ्यांच्या प्रकरणी पोलिसांनी संस्थांचे विश्वस्त किंवा फ्लॅटधारकांच्या निष्काळजीपणाकडे बोट दाखवले आहे. त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असले तरी पुरेशा पोलीस गस्तीअभावी शहरात चोरटय़ांचा सुळसुळाट झाला असल्याचे नाकारता येत नाही.  या पाश्र्वभूमीवर वरील सर्व प्रकरणांचा छडा लावून शहरात वारंवार घडणाऱ्या चोऱ्या-घरफोडय़ांना पायबंद घालण्याचे अवघड आव्हान पोलिसांपुढे आहे.