हुबळी-सिकंदराबाद एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घालून प्रवाशांना धमकावत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याचा प्रकार सोलापूर-गुलबर्गा रेल्वेमार्गावर तडवळ (ता. अक्कलकोट) येथे रविवारी पहाटे घडला. सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे. सध्या रेल्वे प्रशासनातर्फे देशात स्वच्छता सप्ताह पाळला जात असून रविवारी सतर्कता दिवस पाळला जात असतानाच हा गंभीर प्रकार घडला.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी तडवळ रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याला घेराव घालून त्यास धक्काबक्की केली. त्यामुळे तेथील कामकाज काही वेळ ठप्प होऊन त्याचा फटका दुरोंतो एक्स्प्रेससारख्या काही दूर पल्ल्याच्या गाडय़ांना धावण्यास अडथळा निर्माण झाला.
हुबळी येथून सिकंदराबादकडे निघालेली सुपर एक्स्प्रेस पहाटे चारच्या सुमारास तडवळ स्थानकाजवळ आली असता दरोडेखोरांनी रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेची मोडतोड केली. त्यामुळे सिग्नल न मिळाल्याने ही गाडी थांबली. तेव्हा दरोडेखोरांनी चार डब्यात घुसून व खिडक्यांतून शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटले. दरोडेखोरांची संख्या दहापर्यंत होती. या घटनेनंतर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करीत तडवळ रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तरला घेराव घातला. त्यास धक्काबुक्की करून कार्यालयातील फायली भिरकावल्या. दरोडय़ाबाबत सुनील सतीश तिवारी (रा. हैदराबाद) या प्रवाशाने सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. यात ९० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लुटला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सध्या रेल्वेचा स्वच्छता सप्ताह पाळला जात असून रविवारी सर्वत्र सतर्कता दिवस पाळला जात होता. त्यासाठी रेल्वेचे बहुसंख्य अधिकारी रेल्वे मार्गावर व प्रवाशांच्या गर्दीच्या ठिकाणी कार्यरत होते.