जिंतूर शहरातील मुख्य रस्त्यावर आणि पोलीस ठाण्याला लागून असलेले महालक्ष्मी ज्वेलर्स अज्ञात चोरटय़ांनी रविवारच्या मध्यरात्री फोडून ११ लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केले आहेत.
जिंतूर येथील मुख्य रस्त्यावर रमेश शहाणे यांचे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी शहाणे हे दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी  आले असता शटरचे कुलूप तोडलेले त्यांच्या नजरेस पडले. आतमध्ये जाऊन पाहताच दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. दुकानात ठेवलेले ८ लाख रुपयांचे २८० ग्रॅम सोने आणि ३ लाख रुपयांची अर्धा किलो चांदी लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती जिंतूर पोलिसांना दिली. पोलिसांनी श्वानपथकाला सोबत घेऊन पंचनामा केला. श्वानपथकाने दुकानाच्या पाठीमागील रस्ता दाखवला. हा मुख्य रस्ता रहदारीचा असून २४ तास या रस्त्यावर वाहतूक सुरू असते. जवळच पोलीस ठाणे असताना याच रस्त्यावर नेहमीच चोरीच्या घटना घडत आहेत. यापूर्वीही याच रस्त्यावर दुकाने फोडली होती. काही महिन्यांपूर्वी अकोली पाटीजवळ शेतात पडलेल्या दरोडा प्रकरणाचा तपास जिंतूर पोलिसांना लावता आला नाही. शहरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी भयभीत झाले असून रस्त्यावर रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी व्यापारी करत आहेत.