खगोल इतिहासात प्रथमच युरोपियन स्पेस एजन्सी (इएसए)चे ‘रोझेटा’ यान ‘६७ पी’ या धुमकेतूवर ऑगस्टमध्ये पोहोचणार आहे.
सध्या हे यान धुमकेतूच्या केवळ चार हजार किलोमीटर अंतरावर आहे. दहा वर्षांपूर्वी निघालेले हे यान सहा दशलक्ष किलोमीटर अंतर पार करून धुमकेतूजवळ पोहोचेल. त्यामुळे सूर्यमालेच्या व सजीवांच्या निर्मितीचे रहस्य उलगडणार आहे. ही मोहीम जर्मनीतील युरोपियन स्पेस ऑपरेशन सेंटरमधून नियंत्रित केली जाईल, अशी माहिती स्काय वॉच ग्रुप इंडियाचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
‘आर्मगाड्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या धर्तीवर ही योजना आखली गेली आहे. मात्र, येथे मानवाऐवजी रोबोट वापरण्यात आले. दहा वष्रे चार महिने कालावधीचे ‘रोझेटा ओर्बिटर’ हे यान २ मार्च २००४ रोजी सोडण्यात आले. २९०० किलोचे ऑर्बिटर आणि १०० किलोचे लेंडर असून त्यावर १९ वैज्ञानिक उपकरणे आहेत. २५ फेब्रुवारी २००७ रोजी ते मंगळ ग्रहावरून गेले होते. ५ सप्टेंबर २००८ आणि १० जुलै २०१० रोजी ते यान अनुक्रमे ‘स्तेनस’ आणि ‘ल्युशिया’ या लघु ग्रहाजवळून गेले होते.
ऑगस्टमध्ये रोझेटा यान ६७/पी या धुमकेतूजवळ जाऊन १७ महिने प्रदक्षिणा घालेल आणि नोव्हेंबरमध्ये धूमकेतूवर उतरेल, पण धूमकेतूला गुरुत्वबल नसल्यामुळे रोझेटा यान व लेंडर अचूकपणे उतरेल का, हीच खरी कसोटी आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रथमच या यानाला पृथ्वी व सूर्याच्या गुरुत्वीय मदतीने गती देण्यात आली आणि ते संपूर्णपणे सौरऊर्जेवर काम करणार आहे. विशेष म्हणजे, ऊर्जा वाचविण्यासाठी त्याला २०११ ते २०१४ दरम्यान स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले होते आणि गेल्या जुलैमध्ये त्याला पुन्हा सुरू करण्यात वैज्ञानिकांना यश आले होते.