राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना स्वच्छतेसाठी गरजेच्या असलेल्या सॅनिटायझरला सध्या मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या एमआयडीसीतील एका कंपनीतून २० लाखांचा सॅनिटायझरचा बेकायदा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हमरापूर औद्योगिक क्षेत्रातील सारू केमिकल्स या कंपनीमध्ये सॅनिटायझरच्या बेकायदेशीर उत्पादनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने धाड टाकली. यामध्ये सॅनिटायझरचा २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या कंपनीमध्ये सॅनिटायझरचे बेकायदेशीर उत्पादन सुरू होते. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मिळताच या ठिकाणी उत्पादन सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी हे उत्पादन तात्काळ थांबवून बेकायदेशीर असलेला हा साठा जप्त केला आहे.

या कंपनीकडे क्लोरीनेशनच्या उत्पादनाचा करण्याचा परवाना असताना बेकायदेशीर सॅनिटायझर बनविण्याची मोठी यंत्रणा कंपनीत कार्यरत होती. पोलिसांनी या कंपनीतून ४ हजार सीलबंद सॅनिटायझरच्या बाटल्या त्याच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल व यंत्रणा जप्त केली आहे. याची किंमत सुमारे २० लाख रुपयांची असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली.

घटनास्थळी अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल झाले असून त्यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीचा मालक सुलतान लोखंडवाला यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.