भारत आणि तिबेट यांचे संबंध सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका असून, ती नाकारता येणार नाही. देशामध्ये अनुशासन आणि समर्पण हे दोन्ही गुण वाढविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे काम केले आहे. यामुळे संघाच्या नेत्यांबद्दल आपली नितांत आदराची भावना असल्याचे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी येथे सांगितले.
तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा सहा दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांनी दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिरास भेट देऊन डॉ. केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले,ह्वभारत हा मोठा देश असून विविधतेमध्ये एकता आहे.भारत आणि तिबेट यांचे संबंध सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. वीस वर्षांंपूर्वी विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि संघाचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल आणि माजी सरसंघचालक सुदर्शन यांची भेट झाली होती. त्यावेळी तिबेट आणि भारताच्या प्रश्नावर चर्चा झाली. भारत आणि तिबेटचे चांगले संबंध आहेत. मात्र, त्याचे पाहिजे त्या प्रमाणात प्रगटीकरण झाले नाही. ते होणे आज काळाची गरज आहे. संघाने नेहमीच तिबेटच्या प्रश्नावर समर्थन दिले आहे. संघाबद्दल नेहमीच प्रेम आणि आकर्षण राहिले आहे. दीक्षाभूमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय ही दोन्ही केंद्रे नागपुरात असल्यामुळे हे राष्ट्राच्या विचाराचे केंद्र आहे. संघ केवळ देशाचा विचार करीत नाही. जगाचा विचार करीत असल्यामुळे अन्य देशात संघाचे मोठे काम आहे. तिबेटमध्ये संघ संबंधित अन्य संघटना काम करीत असून, त्यांच्याशी अनेक तिबेटी लोक जुळले आहे. येणाऱ्या काळात तिबेट आणि भारत यांचे संबंध सुधारण्यासाठी राष्ट्रीय संघ पुढाकार घेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हैदाबादामध्ये अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी गेले असल्यामुळे ते दलाई लामा यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकले नाही. मात्र, त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून संघाचा तिबेटला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
स्मृती मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी ७ वाजता दलाई लामा येताच पश्चिमांचल कार्यवाह रवींद्र जोशी यांनी त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी दलाई लामा यांनी संघ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून स्मृती मंदिर परिसराची माहिती घेतली.