नगर : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले असले तरी सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करत नियम शिथिलतेची मागणी केली आहे. व्यापारी, कामगार देशोधडीला लावणारा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा एम. जी. रोड व्यापारी असोसिएशन व वंदेमातरम युवा प्रतिष्ठानने दिला आहे.

आ. संग्राम जगताप यांच्यासह जिल्हा प्रशासनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, पोलिस अधीक्षकांना निवेदन पाठवले आहे. आ.जगताप यांना निवेदन देताना प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रतीक बोगावत, ईश्वार बोरा, संतोष ठाकूर, कुणाल नारंग, संभव काठेड, रवी किथानी, आदित्य भळगट आदी उपस्थित होते.

यासंदर्भात माहिती देताना ईश्वार बोरा यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी करोना प्रतिबंधासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी पूर्ण बंद ठेवण्याचे जाहीर केले. असे असताना नगरमध्ये स्थानिक प्रशासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता सरसकट संपूर्ण बाजारपेठा, सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांवर मोठे संकट कोसळणार आहे. अर्थचक्र ठप्प होणार असून व्यापार, व्यवसाय देशोधडीला लावणारा हा निर्णय तातडीने रद्द करून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत नियमावली तयार करून दुकाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी.जिल्हा प्रशासनाचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या विपरीत असून व्यापाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक झाली आहे. सक्तीच्या बंदमुळे व्यापारी, त्यांच्याकडील कामगार यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ येणार आहे. पुन्हा सर्व काही ठप्प झाल्याने बँकांच्या कर्जाचे हप्ते, व्याज, कामगारांचा पगार, शासनाचे कर, वीजबिल, जागेचे भाडे कसे भरायचे, हा गंभीर प्रश्न आहे. अर्थकारण ठप्प करण्याऐवजी सोमवार ते शुक्रवार दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, या काळात व्यापारी काळजी घेऊन व्यवहार करतील.

 मुख्यमंत्र्यांना पत्र

टाळेबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक कोंडी निर्माण होणार आहे. ही कोंडी व्यापारी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. या निर्णयामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. करोना उपाययोजनांसाठी निर्बंध लागू करण्याचा सरकारचा हेतू चुकीचा नसला तरी गेल्यावेळी करोनाविरुद्ध लढायचे कसे याच्या उपाययोजना उपलब्ध नव्हत्या. मात्र आता मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्यामुळे व्यापारी बाजारपेठा बंद ठेवू नयेत. टाळेबंदी शिथिल करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन पाठवून केली आहे.

शहर काँग्रेसचे जिल्हा प्रशासनाला पत्र

राज्य सरकारच्या या निर्णयाला शहर काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे. व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, केशकर्तनालय चालक यांना सायंकाळी पाचपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी किंवा सम-विषम तारखेला दुकाने सुरू करू द्यावीत, व्यापारी व कामगारांचे सरसकट लसीकरण करावे असे पर्याय कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शहराध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात सुचवले आहेत.

व्यापाऱ्यांची मागणी

शहरातील सावेडी उपनगरात व्यवसाय करताना गर्दी होईल अशी परिस्थिती नाही. कारण सावेडीतील बहुतांशी दुकाने संकुलात किंवा स्वतंत्र स्वरूपाची आहेत. गेल्या वर्षापासून करोनामुळे सर्व व्यवसाय संकटात सापडलेले आहेत. अशातच पुन्हा २५ दिवस दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे अनेक छोटे व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती वाटते. किमान सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत, सोमवार ते शुक्रवार व्यापार करण्याची मुभा मिळावी. व्यापारी शासनाच्या सूचना पाळतील, अशी मागणी सावेडी उपनगर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यश शहा, शिवाभाऊ चव्हाण, तेजस शहा, संतोष भोजने, यश गांधी, विपुल छाजेड, किशोर मुथ्था, प्रशांत कुलकर्णी, मंगेश निसळ, सचिन बाफना, प्रमोद डोळसे, आनंद पवार, कैलास भोगे, मुकुंद गायकवाड आदींनी केली आहे.