नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ची लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपान अच्छे दिनचा नारा दिला होता. अच्छे दिन आयेगें अशी घोषणा भाजपाकडून देण्यात आली होती. भाजपाच्या याच घोषणेवर काँग्रेसनं एक व्हायरल व्हिडीओ ट्विट करून टीका केली आहे.

मोदी सरकारवर काँग्रेसकडून टीका होत आहे. करोना, लॉकडाउन आणि घसरलेल्या जीडीपीवरून काँग्रेसकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. यातच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विट करून भाजपाला अच्छे दिनच्या घोषणेवरून टोला लगावला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती वस्तूची विक्री करण्यासाठी ओरडत आहे. चारशे रुपयात आयुष्यभर बसून खा, असं ही व्यक्ती म्हणत आहे. हे वाक्य ऐकून आश्चर्यचकित झालेली व्यक्ती घराबाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीला खुर्ची विकणारा माणूस दिसतो, असा हा व्हिडीओ आहे.

सचिन सावंत यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओवरून त्यांनी टीकाही केली आहे. “अच्छे दिनचा जुमला असाच होता,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

२०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं आक्रमक प्रचार केला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवताना भाजपानं अनेक घोषवाक्य आणि गाणी तयार केली होती. यातच अच्छे दिन आनेवाले है हे गाणही तयार करण्यात आलं होतं. हे गाण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजलंही होतं. त्याचबरोबर भाजपाच्या प्रचाराचे परिणामही निवडणूक निकालातून दिसून आले होते.