यंदाच्या वर्षी पालखी आणि दिंडी सोहळा रद्द

त्र्यंबकेश्वर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी पहिल्यांदाच शिवशाही बसमधून रवाना झाली. यंदा आषाढी एकादशी सोहळ्यावर करोनाचे सावट असल्याने वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पायी पालखी, दिंडी सोहळे रद्द केले. प्रशासनाला सहकार्य करण्याचे धोरण स्विकारण्यात आले.

आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्व आहे. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा, संत एकनाथ यासह अन्य संताच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने दरवर्षी माउलीचे नाव घेत निघतात. तहान भूक विसरत विठुरायाचा जप करत वारकरी पायी पंढरपूर गाठतात. पायी दिंडीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये अलोट असतो. पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी त्या कालावधीचे नियोजन वारकऱ्यांकडून वर्षभरापासूनच करण्यात येत असते. यंदा करोना संकटामुळे त्यांचा उत्साह मावळला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या वतीने पंढरपूरकडे जाणारी पालखी बसमधून नेण्याचा  निर्णय घेण्यात आला. त्यातही बसमधून केवळ २० जणांना प्रवास करता येईल, अशी अट टाकण्यात आली होती.

मंगळवारी सकाळी आठ वाजता संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरात नित्य पूजा झाल्यानंतर तेथील प्रांगणात ठेवलेल्या प्रस्थान पालखीतील श्रींच्या पादुका आणि चांदीच्या पादुकांची जयंत महाराज गोसावी यांनी पूजा केली. अभंग आणि आरतीनंतर मंदिराबाहेर पंढरपूर प्रस्थानाची तयारी पूर्ण करण्यात आली. शिवशाहीला दोन्ही बाजूस भगव्या पताका म्हणजे ध्वज लावण्यात आले. बससाठी फुलांची सजावट फुलांना अनेकांचे स्पर्श होत असल्याने टाळण्यात आली. केवळ एक हार शिवशाहीला लावण्यात आला.

पूजा करण्यात आली. मंदिराबाहेर पूजक सच्चिदानंद गोसावी यांनी श्रींच्या चांदीच्या पादुका आणि प्रतिमा हातात घेतल्यावर औक्षण करण्यात येऊन सुरेश महाराज गोसावी आणि जयंत महाराज गोसावी यांनी ‘धन्य धन्य निवृत्तिदेवा काय महिमा वर्णावा’ हा अभंग म्हटला. या वेळी निवृत्तिनाथ मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.  टाळ आणि मृंदुंगाच्या तालावर सर्व कुशावर्त तीर्थावर  गेल्यावर  नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्याहस्ते सपत्नीक नाथांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. तेथे ही ‘वाचले म्हणता गंगा गंगा पापे जाती भंगा’ अभंग म्हणण्यात आला. अभिषेक, पूजेनंतर त्र्यंबकेश्वर मंदिर चौकात या पादुका आणण्यात आल्या. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त  प्रशांत गायधनी यांनी श्रीफळ देउन स्वागत केले.

यावेळी आ. हिरामण खोसकर, नगरसेवक श्याम गंगापुत्र, स्वप्निल शेलार यांच्यासह निवृत्तिनाथ मंदिराचे विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिकराव थेटे आदी उपस्थित होते. महिला भाविकांनी फुगडय़ा घातल्या. खोसकर आणि वारकऱ्यांनीही फुगडीचा आनंद घेतला. रस्त्याने मोजक्या विश्वस्तांसह वारकरी भाविकांचे ठिकठिकाणी औंक्षण करण्यात आले. त्यानंतर पालखी शिवशाहीतून पंढरपूरकरडे मार्गस्थ झाली. पंढरपूरला जाणाऱ्या पालखीत विश्वस्तांच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. खऱ्या वारकऱ्यांना यंदा वारीला मुकावे लागल्याची खंत काही जणांनी व्यक्त केली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवशाहीमध्ये वारीचे मानकरी, विणेकरी यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी, दोन वैद्यकीय अधिकारी अशा २० जणांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. सर्वाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्वाचे अहवाल तंदुरूस्त असल्याचे आल्यानंतरच त्यांना प्रवासाची परवानगी मिळाली. दहा तासांचा प्रवास विनाथांबा होणार असून बसमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. बस मुक्कामी थांबल्यानंतर आगारात बस पूर्णपणे निर्जंतूक करण्यात येईल. गुरूवारी दुपारी १२च्या सुमारास बस नाशिकच्या दिशेने मार्गस्थ होईल, असे राज्य परिवहन नाशिक आगार एकचे व्यवस्थापक किशोर पाटील यांनी सांगितले.