विधिमंडळाचे अधिवेशन १३ जुलपासून सुरू होत आहे. नव्या सरकारला ६ महिन्यांची संधी आपण दिली. मात्र, या काळात त्यांनी सामान्यांच्या प्रश्नांसाठी काहीही केले नाही. त्यामुळे अधिवेशनात सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार बैठकीत दिला.
राष्ट्रवादीच्या मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी पवार लातुरात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार विक्रम काळे, अमरसिंह पंडित व सतीश चव्हाण, लातूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, बसवराज पाटील नागराळकर, संजय बनसोडे, डी. एन. शेळके आदी उपस्थित होते.
निवडणुकीच्या काळात सरकारने जनतेला मोठी आश्वासने दिली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, महाराष्ट्र टोलमुक्त करू, एलबीटीचा प्रश्न सोडवू, काळा पसा आणून प्रत्येक कुटुंबाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करू, अशी अनेक आश्वासने दिली. गेल्या ७ महिन्यांत एकही आश्वासन सरकारला पूर्ण करता आले नाही. या वर्षी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. उसाला एफआरपीप्रमाणे भाव देता आला नाही. साखर कारखान्यांना २ हजार कोटी बिनव्याजी दिले जातील, असे जाहीर केले. पण हे पसे मिळाले नाहीत. पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याचे आश्वासन दिले, तेही पाळले नाही. हवामान आधारित पीकविमा योजना मागील सरकारने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. या योजनेत आता शेतकऱ्यांना सक्तीने पसे भरावे लागण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताऐवजी विमा कंपन्यांचे हित सरकार पाहणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीसाठी रविवार शिस्तीचा!
राष्ट्रवादीने मराठवाडय़ातील निमंत्रित कार्यकर्त्यांचे चर्चासत्र घेतले. यास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील यांसारखी दिग्गज मंडळी सहभागी होती. नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेले बसवराज पाटील नागराळकर यांना पक्षाने सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली. पक्ष बठकीत त्यांनी संघटन मजबूत करण्याची कल्पना मांडली. त्यातून राज्याच्या कार्यशाळेची सुरुवात मराठवाडय़ापासून करण्याचे ठरले. यात सर्व निमंत्रित हिरिरीने सहभागी झाले. मात्र, १५ वष्रे सत्तेत असल्यामुळे लोकांपासून आपला संपर्क कमी झाला, याची कबुली या वेळी अनेकांनी दिली. सर्व कार्यक्रम शिस्तीत व वेळेत पार पडले. पत्रकार बैठकीसही १० मिनिटे आधीच सर्वजण येऊन थांबले. चर्चासत्रात दिलेल्या विषयावर व दिलेल्या वेळेत सर्वानी आपली मते मांडली. सर्व कार्यकर्त्यांची मते नेत्यांनी ऐकून घेतली. हा बदल राजकीय क्षेत्रात भुवया उंचावणारा असल्याचे मानले जाते.